पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन तिघांची २४ लाखांची फसवणुक
निवृत्त पोलीस अधिकार्यासह शिक्षिका, वरिष्ठ अधिकार्याचा समावेश
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – तीन वेगवेगळ्या घटनेत पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून घरबसल्या जास्तीत जास्त कमिशन कमविण्याची संधी असल्याची बतावणी करुन तिघांची सुमारे २४ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुक झालेल्यांमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकार्यासह शाळेच्या शिक्षिका तसेच एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्याचा समावेश आहे. या तिघांच्या तक्रार अर्जावरुन खार, आग्रीपाडा आणि मरिनड्राईव्ह पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. दररोज ऑनलाईन फसवणुकीचे विविध प्रकरणे बाहेर येत असताना उच्चशिक्षित असलेल्या या तिघांची सायबर ठगाकडून झालेल्या फसवणुकीनंतर पोलिसांना आश्चर्य वाटत आहे.
५८ वर्षांचे तक्रारदार निवृत्त पोलीस अधिकारी असून ते सध्या भायखळा परिसरात राहतात. ते गुप्तवार्ता विभागातून निवृत्त झाले असून सध्या घरी असतात. १३ सप्टेंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना सलोनी सिम्बा नावाच्या एका महिलेचा मॅसेज आला होता. त्यात पार्टटाईम जॉबविषयी माहिती देण्यात आली होती. यावेळी त्यांनी जॉबसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना टेलिग्राम ऍपवरुन विविध टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा होत होती. तिने पाठविलेले लिंक ओपन करुन त्यांनी त्याला लाईक केले होते. त्यानंतर स्क्रिनशॉट पाठवून तिला पाठवून दिले होते. त्यासाठी त्यांना एक टास्क कोड देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीने कॉल करुन त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन लाईक आणि रिव्हयू देण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी संबंधित वेबसाईटवर जाऊन लाईक आणि रिव्हयू देण्यास सुरुवात केली होती. ते टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात १३ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या दोन दिवसांत ३८ हजार ३८० रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा झाल्याने त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर टास्कसाठी पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. त्यात त्यांना जास्त परतावा मिळणार आहे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या टास्कसाठी दहा लाख साठ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र त्यांना मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मिळाली नाही. पैशांसाठी त्यांना आणखीन पैसे भरण्यास सांगण्यात येत होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत पार्टटाईम जॉबच्या नावाने एका ५३ वर्षांच्या शिक्षिकेची सायबर ठगांनी ६.६६ लाखांची फसवणुक केली होती. ही महिला खार परिसरात राहत असून ती गेल्या २५ वर्षांपासून विविध शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तिला ऑनलाईन जॉबची गरज होती. त्यामुळे सोशल मिडीयावर येणार्या पार्टटाईम जॉबविषयी ती नेहमी माहिती घेत होती. १२ सप्टेंबरला तिला सोशल मिडीयावर एक पार्टटाईम जॉबची जाहिरात दिसली होती. तिने ती लिंक ओपन करुन आपण पार्टटाईम जॉबसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिला सुरुवातीला प्रिपेड टास्क देण्यात आले होते, ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिला कमिशन रक्कम पाठविण्यात आली. नंतर तिला कंपनीच्या टास्कमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तीस टक्के कमिशनचे गाजर दाखविण्यात आले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून तिने विविध टास्कसाठी ६ लाख ६६ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा न देता या सायबर ठगांनी तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने खार पोलिसांत तक्रार केली होती.
तिसर्या गुन्ह्यांत विविध हॉटेल, रेस्ट्रॉरंट, मॉल आदींना रेटींगचे टास्क देऊन एका खाजगी कंपनीच्या उपव्यवस्थाक अधिकार्याची ६.८५ लाखांची फसवणुक करण्यात आली होती. ४९ वर्षांचे तक्रारदार वरळी परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून काम करतात. १० सप्टेंबरला त्यांना पार्टटाईम जॉबसंदर्भात एक मॅसेज प्राप्त झाला होता, सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. तरीही संबंधित व्यक्तीकडून त्यांना दिवसाला पाचशे ते तीन हजार रुपये कमवा असा मॅसेज पाठवत जात होता. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन करुन टास्कची माहिती घेतली होती. यावेळी त्यांना शहरातील विविध हॉटेल्स, रेस्ट्रॉरंट आणि मॉलला रेटींगचे टास्क देण्यात आले होते. प्रत्येक टास्कमागे त्यांना कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ते टास्क पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांना विविध टास्कसाठी पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांनीही विविध टास्कसाठी ६ लाख ८५ हजार ५६० रुपयांची गुंतवणुक केली. मात्र गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर कुठेही कमिशन न मिळाल्याने त्यांना फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आग्रीपाडा, खार आणि मरिनड्राईव्ह पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.