मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० मार्च २०२४
मुंबई, – जास्त कमिशनच्या मोहापायी एका तरुणीने सुमारे दहा लाख रुपये गमावल्याची घटना सांताक्रुजच्या वााकोला परिसरात उघडकीस आली आहे. पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन विविध टास्कद्वारे ही फसवणुक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या ठगाचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
३१ वर्षांची तक्रारदार तरुणी ही सांताक्रुज येथील कालिना परिसरात राहते. ती गेल्या चार वर्षांपासून एका शिपिंग कंपनीत करत असून अमेरिकेत कामाला आहे. ११ फेब्रुवारीला ती तिच्या बहिणीला भेटण्यासाठी आली होती. याच दरम्यान तिला व्हॉटअपवर एक मॅसेज आला होता. त्यात तिला घरबसल्या काही मिनिटांत दोन ते तीन हजार रुपये कमावू शकतात असे नमूद केले होते. कंपनीसह रेपोटेड हॉटेलला फाईव्ह स्टार दिल्यास तिला प्रत्येक टास्कमागे ५० रुपये मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने त्यास होकार दिला होता. यावेळी तिला एक टेलिग्राम लिंक पाठवून त्यांच्या ग्रुपमध्ये सामिल करुन घेण्यात ाअले होते. तिने कंपनीसह हॉटेलचे टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात कमिशनची रक्कम येऊ लागली होती. त्यामुळे तिला त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता. त्यानंतर तिला कंपनीचे पॅकेज घेतल्यास जास्त कमिशन मिळेल असे सांगून अज्ञात व्यक्तीने तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने जास्त कमिशनसाठी कंपनीचे पॅकेट टास्क घेण्याचा निर्णय घेतला होता. या टास्कसाठी तिला आधी काही रक्कम गुंतवणुक करावी लागणार होती. त्यामुळे तिने विविध टास्कसाठी ९ लाख ८८ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.
ते सर्व टास्क पूर्ण केल्यानंतर तिने मुद्दलसह कमिशनच्या रक्कमेची मागणी केली होती. यावेळी तिला टॅक्ससाठी ३ लाख ८८ हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. ही रक्कम भरल्यानंतर तिच्या खात्यात १६ लाख ८२ हजार रुपये जमा होतील असेही समोरील व्यक्तीने सांगितले होते. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने टॅक्सचे पैसे भरण्यास नकार दिला. घडलेल्या प्रकारानंतर तिने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. १ मार्च ते ४ मार्च या कालावधीत अज्ञात ठगाने जास्त कमिशनचे आमिष दाखवून या तरुणीची सुमारे दहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. त्यामुळे या गुन्ह्यांची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.