सायन हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरला मारहाणीमुळे तणाव
रुग्णासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल; दोघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ड्रेसिंग करताना दुखू लागल्याने रुग्णासह त्याच्या नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरलाच शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी पहाटे सायन हॉस्पिटलमध्ये घडली. या घटनेने कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकार्यासह कर्मचार्यांमध्ये प्रचंड संतापाची उसळली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तेक्षप करुन रुग्णालयासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दोन्ही नातेवाईकाना नंतर सायन पोलिसांनी अटक केली.
यातील तक्रारदार महिला सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करतात. रविवारी रात्री त्यांची रात्रपाळीवर होती. तिथे कर्तव्य बजावत असताना पहाटे पावणेचार वाजता तिच्याकडे प्रशांत नावाचा एक रुग्ण आला होता. त्याचे ड्रेसिंग करताना त्याला दुखू लागले होते. त्यामुळे रागाच्या भरात त्याने डॉक्टर महिलेला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. हा प्रकार त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. इतकेच नव्हे तर रुग्णासाठी वापरलेला कापसाचा बोळा डॉक्टरला लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात या महिला डॉक्टरला दुखापत झाली होती. या प्रकाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला होता. या महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रुग्णासह त्याच्या नातेवाईकाविरुद्ध ११५ (२), ३५२, ३ (५) भारतीय न्याय सहिता सहकलम ३, ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेच्या हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होात. गुन्हा दाखल होताच शिवीगाळ करुन मारहाण करणार्या दोन्ही नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.