पत्रावाला चाळ पुर्नविकास कथित घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई
प्रविण राऊतसह त्यांच्या निकटवर्तींची ७३.६२ कोटीची प्रॉपटी जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – गोरेगाव परिसरातील बहुचर्चित पत्रावाला चाळ पुर्नविकास कथित घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी प्रविण राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चांगला दणका दिला. प्रविण राऊतसह त्यांच्या कुटुंबियांची सुमारे ७३ कोटीची प्रॉपटी ईडीने तात्पुरती जप्त केली आहे. प्रविण राऊत हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय समजले जातात. जप्त करण्यात आलेल्या प्रॉपटीमध्ये ठाण्यासह पालघर, दापोली आणि रायगडच्या जमिनीचा समावेश आहे. याच प्रकरणात ईडीने आतापर्यंत ११६ कोटीच्या प्रॉपटीवर तात्पुरती टाच आणली असून त्यात आता या प्रॉपटीची भर पडली आहे.
गोरेगावच्या पत्रावाल चाळ पुर्नविकासमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला होता. जवळपास एक कोटी चाळीस हजार कोटीच्या कथित घोटाळ्याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच ईडीने स्वतंत्रपणे तपास सुरु केला होता. त्यानंतर ईडीकडून संबंधित आरोपीविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यापूर्वी या अधिकार्यांनी खासदार संजय राऊत यांच्या घरासह कार्यालयात छापा टाकला होता. या छाप्यानंतर संजय राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. बॅलार्डपिअर कार्यालयात चौकशी केल्यानतर संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. तीन महिने कारागृहात राहिल्यानंतर ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने जामिनावर सोडून देण्यात आले होते. संजय राऊत यांना अटक करण्यापूर्वी या गुन्ह्यांत प्रविण राऊत यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात आले होते. ते दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत.
याच गुन्ह्यांत ईडीने कारवाई करुन गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आणि संचालक राकेशकुमार वाधवान आणि सारंगकुमार वाधवान यांच्या उत्तरप्रदेशातील काही प्रॉपटीवर जप्ती आणली होती. जवळपास ३१ कोटी ५० लाख रुपयांची ही प्रॉपटी होती. त्यानंतर संजय राऊतसह प्रविण राऊत यांच्या मालकीच्या ११ कोटी १५ लाखांच्या प्रॉपटीवर टाच आणण्यात आली होती. आता ईडीने प्रविण राऊतसह त्यांच्या निकटवर्तींची ७३ कोटी ६२ लाखांची प्रॉपटी तात्पुरती जप्त केली आहे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रविण हे संचालक म्हणून काम करत होते. त्यांच्याच कंपनीला गोरेगाव येथील पत्रावाला चाळीचा ६७२ भाडेकरुंच्या पुर्नविकासासाठी पुर्नविकास करण्याचे काम देण्यात आले होते. त्यासाठी सोसायटी, संबधित कंपनीसह म्हाडामध्ये त्रिपक्षीय करार झाला होता. या करारानुसार ६७२ भाडेकरुंना फ्लॅट उपलब्ध करुन उर्वरित जमिन क्षेत्र विकायचे होते.
मात्र गुरुआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केली. म्हाडाच्या विस्थापित भाडेकरुंना पुर्नविकासात फ्लॅट न देता, म्हाडाच्या जागेची ९०१ कोटी ७९ लाख रुपयांची जमिन नऊ विकासकांना फसवणुक करुन फ्लोअर स्पेस इंडेक्सद्वारे विकले होते. हा पुर्नविकास प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्यात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे ईडीने म्हटले होते. या गुन्हयांतील सुमारे ९५ कोटीची काही रक्कम प्रविण राऊत यांच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आले होते. त्यापैकी काही रक्कम त्यांनी स्वतकडे ठेवली तर काही रक्कमेतून जमिन खरेदी करुन त्यांच्या कुटुंबियांना भेट दिल्याचे उघडकीस आले होते. याच प्रकरणात ईडीने आतापर्यंत दोन आरोपपत्र दाखल केले असून त्याची नियमित सुनावणी सुरु असल्याचे सांगण्यात आले.