बँकेत गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्धाची 27 लाखांची फसवणुक

वॉण्टेड असलेल्या तोतया बँक कर्मचार्‍याला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन बँकेत गुंतवणुक केल्यास 22 टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृद्धाची सुमारे 27 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गौरव अनिलकुमार भाटिया नावाच्या एका तोतया बँक कर्मचार्‍याला पवई पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही फसवणुक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

74 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार सत्येंद्र कुमारसिंग भल्ला हे त्यांच्या पत्नीसोबत पवई परिसरात राहतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा समीर भल्ला याचे ट्रेडिंग आणि इंजिनिअरींगचा व्यवसाय असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत दुबई येथे वास्तव्यास आहे. जानेवारी 2025 रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्याचे नाव गौरव भाटिया असल्याचे सांगून तो त्यांच्या बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते. त्याने त्यांना बँकेत गुंतवणुक केल्यास त्यांना 22 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र त्यांनी त्याला गुंतवणुकीसाठी नकार दिला होता.

तरीही जानेवारी ते जून 2025 या कालावधीत गौरवने अनेकदा त्यांना कॉल करुन गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँकेत काही रक्कम गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी त्याला काही कोरे धनादेश दिले होते. त्याने त्यांच्याकडून त्यांच्यासह त्यांच्या मुलाचे एकूण 26 कॅन्सल धनादेश घेतले होते. जुलै महिनयांत त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख, पन्नास हजार आणि साठ हजार रुपयांचे व्यवहार झाले होते. पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज त्यांच्यासह त्यांच्या मुलाला आला होता. मात्र सत्येंद्र भल्ला यांची प्रकृती ठिक नसल्याने तसेच ते हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याने त्यांनी त्याची शहानिशा केली नव्हती.

याच दरम्यान त्यांचा मुलगा समीर हा दुबईहून मुंबईत आला होता. त्याने त्याच्यासह सत्येंद्र यांच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला त्याच्या वडिलांच्या बँक खात्यातून 14 लाख 16 हजार तर त्याच्या बँक खात्यातून 17 लाख 53 हजार रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. 7 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत गौरव भाटिया याने या पिता-पूत्रांच्या बँक खात्यातून 27 लाख 37 हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्याने कुठे आणि कधी गुंतवणुक केली याबाबत माहिती घेण्यासाठी समीरने गौरवला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही.

बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन गौरवने बँकेत गुंतवणुकीच्या नावाने सत्येंद्र भल्ला यांच्याकडून 26 कोरे धनादेश प्राप्त करुन त्यांची गुंतवणुकीच्या बहाण्याने 27 लाख 37 हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गौरव भाटिया याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना शनिवारी गौरवला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सत्येंद्र भल्ला यांना विश्वासात घेऊन गुंतवणुकीच्या बहाण्याने घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page