फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी अटक

दिडशे कोटीच्या कर्जाच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक

0

अरुण सावरटकर
५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दिडशे कोटीचे कर्ज देतो असे सांगून पवईतील एका इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाची सुमारे दोन कोटीची फसवणुक कटातील वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी अखेर पवई पोलिसांनी अटक केली. राजेशचंद्र नागरतन पिल्लई असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो पाचवा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत राजशेखर सुबय्या ऊर्फ एस. के तेवर ऊर्फ राजन, ए सेतुराज ऊर्फ सेतूराज असीअवदम, एम. थॉमस ऊर्फ थॉमस मदुरा आणि शनमुगसुंदरम ए ऊर्फ शनमुगसुंदरम अनडीअयपन अशा चौघांना पोलिसांनी अटक केली.

राकेश देवेंद्रकुमार दुगर हे पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात राहत असून ते इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहेत. त्यांची एक खाजगी कंपनीत असून ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व्यवसाय करते. त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायचा होता, त्यासाठी त्यांना शंभर ते दिडशे कोटीच्या आर्थिक कर्जाची गरज होती. त्यांच्यावर आधी काही बँकांचे कर्ज होते, ते कर्ज फेडून उर्वरित रक्कम व्यवसायात गुंतविण्याचा त्यांचा विचार होता. याच दरम्यान त्यांच्या मित्रांनी त्यांची नवी मुंबईतील सुरेश नायडू याच्याशी ओळख करुन दिली होती. त्याने सुंदर नावाचा एक व्यक्ती सुब्रमण्यम याच्या मदतीने त्यांना कर्ज मिळवून देईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूचा रहिवाशी असलेल्या सुब्रमण्यमशी फोनवरुन चर्चा केली होती. त्याने त्यांच्या कंपनीची बॅलेन्सशीटची मागणी करुन त्याच्या परिचित थॉमस आणि राजन हे त्यांना कर्ज देतील असे आश्‍वासन दिले होते. एप्रिल २०२१ रोजी ते त्यांच्या मित्रांसोबत तामिळनाडू येथे गेले होते. तिथे त्यांची ओळख सुंदर आणि थॉमसचा मुलगा अजीतशी झाली होती. त्यानंतर सुंदर, सुब्रमण्यम, थॉमस आणि अजीत अशा चौघांनी त्यांना कराईकुडी येथील अध्यक्ष राजन यांच्या गेस्ट हाऊसमध्ये आणले होते. तिथे राजनशी ओळख करुन दिल्यानंतर त्यांच्यात कर्जाविषयी सविस्तर बोलणी झाली होती. त्यांच्या कंपनीचे कागदपत्रे पाहिल्यानंतर राजनने त्यांना दिडशे कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आश्‍वास दिले होते. त्यासाठी त्यांना दोन टक्के रजिस्ट्रेशन फी असे तीन कोटी रुपये केरळ सरकारकडे जमा करावे लागतील असे सांगितले.

राजन हे स्थानिक नामांकित राजकीय नेते होते, त्यांची अनेक मंत्र्यासह राजकीय नेत्यांशी चांगले संबंध होते. निवडणुकीत ते त्यांच्या मतदारांना फ्री वस्तू देतात. गेल्या वेळेस त्यांनी सर्वांना टिव्ही दिले होते, आगामी निवडणुकीत त्यांनी सर्वांना फ्रीमध्ये वॉशिंग मशिन देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे पन्नास हजार वॉशिंग मशिन ते त्यांच्याकडून घेतील असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तसे झाल्यास त्यांना चांगला फायदा होणार होता. त्यातच रजिस्ट्रेशन फीची रक्कम केरळ सरकारमध्ये जमा होणार होती, त्यामुळे त्यांनी त्यांची मागणी मान्य केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना तीन कोटी रुपये दिले होते. २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांच्यात एक करार होणार होता. या करारानंतर त्यांना २५ कोटीचे सहा डी डी असे दिडशे कोटी रुपयांचे धनादेश मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ते डीडी बँकेत जमा केले नाही किंवा त्यांना दिले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते सर्वजण त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे कर्जासाठी दिलेले तीन कोटी रुपये परत मागितले. मात्र या आरोपींनी त्यांना पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या तामिळनाडूच्या मित्राला सांगितला. या मित्राच्या मध्यस्थीने आरोपींनी त्यांना एक कोटी रुपये परत केले होते.

मात्र उर्वरित दोन कोटीचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे राकेश दुगर यांनी पवई पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुरेश ऊर्फ नित्यानंद नायडू, सुंदर, थॉमस, त्याचा मुलगा अजीत, सुब्रमण्यम, राजेंद्रन चंद्रन, राजन आणि ए सेतुराज या आरोपीविरुद्ध बोगस कराराचे दस्तावेज बनवून दोन कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच १० फेब्रुवारीला एम. थॉमस, ए सेतूराज आणि शमुगसुंदरम या तिघांना तर जून महिन्यांत राजशेखर सुबय्या अशा चौघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्यात इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांचा शोध सुरु असताना या गुन्ह्यांत दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या राजेशचंद्र पिल्लईला पवई पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. इतर पळून गेलेल्या आरोपींचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page