टोरेसनंतर ऍक्वा मरिन ग्लोबन कल्चर कंपनीच्या पर्दाफाश
गुंतवणुकीच्या नावाने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – दादरच्या टोरेस कंपनीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानंतर आता अंधेरी ऍक्वा मरिन ग्लोबन कल्चर कंपनीचा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. गुंतवणुकीवर पंधरा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने या कंपनीने एका तरुणाची सुमारे बारा लाखांची फसवणुक केली असून त्याच्या तक्रारीवरुन कंपनीच्या दोन संचालकासह मॅनेजर आणि एजंट अशा चौघांविरुद्ध पवई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विनय कांबळे, स्वप्नील कांबळे, चंद्रकांत मोरे आणि ग्यानेंद्र गुप्ता अशी चौघांची नावे असून ते सर्वजण ऍक्वा मरिन ग्लोबल कल्चर कंपनीचे संचालक, मॅनेजर आणि एजंट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पळून गेलेल्या या चारही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कंपनीत अनेकांनी गुंतवणूक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोहम्मद इस्माईल इब्राहिम शेख हा २८ वर्षांचा तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतो. तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर त्याचे वडिल रिक्षाचालक म्हणून काम करतात. काही महिनयांपूर्वी त्याला त्याचा परिचित अल्ताफ देरिया याच्याकडून अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस मेट्रो स्टेशनजवळील ऍक्वा मरिन ग्लोबन कल्चर कंपनीविषयी माहिती समजली होती. ही कंपनी फिशिंग विभागाशी संबंधित असून कंपनीचे गुजरातच्या सुरत शहरात फिशिंगचे मोठे फिशिंग फर्म आहे. या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळत असून कंपनीत आतापर्यंत अनेकांनी गुंतवणुक केली होती. या सर्वांना पंधरा ते वीस टक्के परतावा मिळाला आहे असे समजले होते. त्यामुळे तो अल्ताफसोबत कंपनीच्या कार्यालयात गेला होता.तिथेच त्याची एजंट ग्यानेंद्रशी ओळख झाली हेती. त्याने विनय आणि स्वप्नील कांबळे कंपनीचे संचालक तर चंद्रकांत हा मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगतले. त्याने त्यांच्या कंपनीत अनेकांना गुंतवणुक केल्याचे सांगून त्यांना पंधरा टक्क्याप्रमाणे परतावा मिळाला आहे.
काही दिवसांनी ग्यानेंद्रने त्याला फोन करुन अल्ताफने कंपनीत पंधरा लाखांची गुंतवणुक केली असून त्यानेही कंपनीत गुंतवणुक करावी असा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याने ग्यानेंद्रकडे ऑनलाईन दोन तर कॅश स्वरुपात बारा लाखांची गुंतवणुक केली होती. या दोन लाखांवर त्याला तीन महिने ९० हजाराचे व्याज देण्यात आले होते. त्यापैकी तीस हजार कॅश तर साठ हजार त्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. मात्र तीन महिन्यानंतर त्याने व्याजाची रक्कम दिली नाही. याबाबत त्याने चौकशी केल्यानंतर त्याच्यासह इतर गुंतवणुकदारांना कंपनीने फक्त तीन महिने व्याजाची रक्कम दिली नाही. नंतर व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी अंधेरीतील कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी त्यांना नवी मुंबईतील खारघर येथील कार्यालयात पाठविणयात आले होते. तिथे गेल्यानंतर मॅनेजर चंद्रकांत मोरे याने सर्वांना मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम मिळेल असे आश्वासन दिले.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी गुंतवणुकदारांना पैसे परत केले नाही. अशा प्रकारे कंपनीचे संचालक विनय कांबळे, स्वप्नील कांबळे, मॅनेजर चंद्रकांत मोरे आणि एजंट ग्यानेंद्र गुप्ता यांनी गुंतवणुकीवर १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याच्यासह इतर गुंतवणुकदारांची फसवणुक केली. त्यांच्या पैशांचा अपहार करुन ते सर्वजण पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी मोहम्मद इस्माईल शेख याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपीविरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते चौघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दादर येथील टोरेस कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अंधेरीतील या दुसर्या घोटाळ्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत एका तक्रारदाराने तक्रार केली असता आगामी काळात इतर काही गुंतवणुकद तक्रार करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा अणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऍक्वा मरिन ग्लोबन कल्चर कंपनीकडून फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी पवई पोलिसांत तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.