गुंतवणुकीच्या आमिषाने आयकर अधिकार्‍यांची फसवणुक

दोन कापड व्यापार्‍याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – कपड्याच्या व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एका आयकर विभागाच्या अधिकार्‍याची दोन कापड व्यापार्‍यांनी सुमारे ३० लाखांची फसवणुक केल्याची घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमरसिंग राजपुरोहित आणि कमलेश राजपुरोहित या दोन कापड व्यापार्‍याविरुद्ध पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही व्यापारी पळन गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

मनिषकुमार सुबोमोहन ठाकूर हे पवईतील म्हाडा, आयकर विभाग वसाहतीत राहत असून ते आयकर विभागात अधिकारी पदावर कामाला आहेत. अमरसिंग आणि कमलेश हे दोघेही त्यांच्या परिचित असून त्यांचा ज्योत लिला नावाचे कपड्याचा व्यवसाय पवईतील चैतन्यनगरात आहे. अनेकदा ते त्यांच्याकडे कपडे घेत असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. भेटीदरम्यान ते दोघेही त्यांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला देत होते. मात्र त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले होते. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्याकडे व्यवसायासह मुलीच्या लग्नासाठी पैशांची मागणी केली होती. ते दोघेही त्यांच्या चांगल्या परिचित असल्याने त्यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत टप्याटप्याने ३० लाख ५० हजार रुपये दिले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पैसे परत केले नाही. त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या व्यवसायात पार्टनर बनविण्याचे आमिष दाखविले होते. पार्टनर म्हणून त्यांनी दिलेली रक्कम गुंतवणुक म्हणून जमा होईल. व्यवसायातून होणारा फायदा त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचेही आश्‍वासन दिले होते. त्यांची ऑफर चांगली होती, त्यामुळे त्यांनी त्यास होकार दिला होता. मात्र या दोघांनी पार्टनरशीपचा करार केला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर त्यांनी त्यांना भेटणे टाळले होते. कॉल केल्यानंतर या दोघांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवले होते. त्यामुळे ते त्यांच्या कपड्याच्या शॉपमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना अमरसिंग आणि कमलेश शॉप बंद करुन कुठेतरी निघून गेल्याचे समजले.

अशा प्रकारे त्यांना या दोघांनी कपड्याच्या व्यवसायात गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्या पत्नीला पार्टनरशीपची ऑफर देऊन त्यांनी दिलेल्या ३० लाख ५० हजाराचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच मनिषकुमार ठाकूर यांनी पवई पोलिसात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अमरसिंग राजपुरोहित आणि कमलेश राजपुरोहित या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page