ड्रोन उडविल्याप्रकरणी 23 वर्षांच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
दुरुस्तीनंतर ड्रोनचा ट्रायल घेणे तरुणाला चांगलेच महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – मुंबई शहरात ड्रोन उडविण्यास बंदी असताना पवई परिसरात ड्रोन उडविल्याप्रकरणी अंकित राजेंद्र ठाकूर या तरुणाविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुरुस्तीनतर ड्रोनचा ट्रायल घेणे अंकित चांगलेच महागात पडले आहे.
रविवारी रात्री साडेबारा वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका व्यक्तीने कॉल करुन पवईतील साकिविहार रोड, सोलारिस परिसरात एक ड्रोन खाली पडताना पाहिल्याची माहिती दिली होती. ही माहिती नंतर पवई पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर पवई पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. चौकशीदरम्यान अंकित ठाकूर याने ड्रोन उडविल्याचे उघडकीस आले. अंकित हा मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून तो सध्या पवईतील साकिविहार रोड, लेक ब्लूम सोसाययटीच्या रुम क्रमांक 710 मध्ये राहतो. तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे.
अंकितला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने तो ड्रोन एक वर्षांपूर्वी घेतला होता. ड्रोन खराब झाल्याने तो काही दिवसांपूर्वी दुरुस्त केला होता. त्याची ट्रायल घेण्यासाठी त्याने ड्रोन हवेत उडविला होता. मात्र तो व्यवस्थित न उडता खाली पडला. हा ड्रोन काही स्थानिक रहिवाशांनी पाहिला आणि ती माहिती कंट्रोल रुमला दिली होती.
याप्रकरणी ड्रोनसहीत अंकित पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ड्रोन उडविण्याबाबत त्याने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी 223 अ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.