हॉटेल मॅनेजरला अटक तर दोन विदेशी तरुणींची सुटका

अंधेरीतील कोझी इन हॉटेलमध्ये सुरु होता सेक्स रॅकेट

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 नोव्हेंबर 2025
मुंबई, – हॉटेल व्यवसायाच्या नावाने सेक्स रॅकेट चालविणार्‍या हॉटेलच्या मॅनेजर मोहम्मद दाऊद मोहम्मद अख्तरअली शेख (23) याला पवई पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन विदेशी तरुणींची सुटका केली असून त्या दोघीही युगांडा आणि केनिया देशाच्या नागरिक आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत हॉटेलचा मालक अब्दुल करीम याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना ठेवून त्यांच्यामार्फत हा सेक्स रॅकेट सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अंधेरीतील मरोळ, मिलिटरी रोडवरील अशोक टॉवरसमोर कोझी ईन नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये विदेशी महिलांना भाड्याने रुम देऊन त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाची मदत घेतली होती. ठरल्याप्रमाणे हा बोगस ग्राहक गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता कोझी ईन हॉटेलमध्ये गेला होता. काही काही वेळ घालविल्यानंतर त्याने हॉटेलचा मॅनेजर मोहम्मद दाऊद याच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. यावेळी त्याने त्याला दोन आफ्रिकन तरुणी दाखविले होते. त्यापैकी त्याने एका तरुणीची निवड केली होती. यावेळी त्याने त्याच्याकडे तिच्यासोबत शरीरसंबंधासाठी साडेतीन हजाराची मागणी केली होती.

त्यापैकी पाचशे रुपये त्याने घेतले आणि उर्वरित तीन हजार रुपये निवडलेल्या तरुणीला देण्यास सांगितले. त्यानंतर ते दोघेही हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक 214 मध्ये गेले होते. यावेळी बोगस ग्राहकाने पोलिसांना मिस कॉल देऊन हिरवा कंदिल दिला होता. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक आव्हाड, पोलीस हवालदार खंडागळे, चव्हाण, महिला पोलीस शिपाई लाड यांनी तिथे अचानक छापा टाकला होता. यावेळी मॅनेजर मोहम्मद दाऊदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हॉटेलमधील झडतीत पोलिसांना दोन विदेशी तरुणी सापडल्या. त्यापैकी एक तरुणी केनियाच्या बनगोमा तर दुसरी तरुणी युगांडाच्या मुलागोची रहिवाशी होती.

चौकशीत त्या दोघीही हॉटेलमध्ये राहत होत्या. त्यांच्या मदतीने मॅनेजर मोहम्मद दाऊद हा तिथे सेक्स रॅकेट चालवत होता. या तरुणींसोबत ग्राहकांना शारीरिक संबंधासाठी पाठविले जाते. त्यासाठी प्रत्येकी तरुणीमागे साडेतीन हजार रुपये घेतले जात होते. त्यापैकी काही रक्कम त्या तरुणींना देऊन उर्वरित रक्कम तो स्वत घेत होता. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच मोहम्मद दाऊदला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मोहम्मद दाऊद हा मूळचा बिहारचा सहरसाचा रहिवाशी असून कोझी इन हॉटेलमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page