मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – पवईच्या आयआयटच्या 21 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नमन अग्रवाल असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने मानसिक तणावातून इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पवई पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. नमनच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली असून त्यांची पोलिसांकडून लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री घडलेल्या या आत्महत्येने आयआयटी वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
नमन हा राजस्थानच्या पिलानीचा रहिवाशी असून सध्या तो पवईच्या आयआयटीमध्ये बीटेकच्या दुसर्या वर्षांत शिक्षण घेत होता. शिक्षणासोबत तो आयआयटीच्या वसतिगृहाच्या इमारत क्रमांक तीनमध्ये राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्यातून त्याला प्रचंड नैराश्य आले होते. मंगळवारी रात्री उशिरा तो त्याच्या रुममधून बाहेर आला होता. त्यानंतर तो इमारत क्रमांक चारच्या टेरेसवर गेला. तिथे काही वेळ थांबल्यानंतर त्याने इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता.
इमारतीवरुन काहीतरी पडल्याचा आवाज येताच सुरक्षारक्षकांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी त्यांना नमन हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती पवई पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धावघेतली होती. नमनला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही.
मात्र तो मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही माहिती नंतर त्याच्या राजस्थानमध्ये राहणार्या पालकांना देण्यात आली होती. ते मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. त्याच्या पालकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. गेल्या वर्षी अशाच प्रकारे अन्य एका विद्यार्थ्याने इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे या घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल घेत आहेत.
आगामी काळात सर्वच इमारतीच्या टेरेसला कुलूप लावण्यात येणार आहे. टेरेसवर विद्यार्थ्यांनी जाऊ नये यासाठी नोटीस जारी केली जाणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान पवई पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. नमनसोबत शिकणार्या आणि त्याच्यासोबत रुममध्ये राहणार्या सर्व विद्यार्थ्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. नमनचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलची तपासणी सुरु आहे.