मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याप्रकरणी एका ५५ वर्षांच्या ज्वेलर्स व्यापार्याला पवई पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. आरोपी तक्रारदार मुलीच्या आईच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी २६ जुलैला सकाळी अकरा वाजता तक्रारदार मुलीच्या पवईतील राहत्या घरी घडली होती. ही मुलगी पवई येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरोपी हा अंधेरीतील मरोळ परिसरात राहत असून त्याचे ज्वेलर्स दुकान आहे. तो तिच्या आईच्या परिचित आहेत. सोमवारी तो तिच्या घरी आला होता. यावेळी घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून त्याने तिला तू दिसायला खूप सुंदर आहेस, मला तू खूप आवडतेस असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तो तेथून पळून गेला. घडलेल्या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र शुक्रवारी ३० जुलैला तिने पवई पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.