मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नासह खंडणी आणि अपहरण तसेच ड्रग्जच्या गुन्ह्यांत असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करुन दंगल घडविणार्या दोन महिलांना अखेर पवई पोलिसांनी अटक केली. मिसबा ऊर्फ जेबा आतिक खान आणि रेश्मा मीर खान ऊर्फ पप्पू आपा अशी या दोन महिलांची नावे असून अटकेनंतर या दोघींना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघींनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून या दोघीही वॉण्टेड होत्या. अखेर त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत मुबारक मोमीन खान, मदिना हैदरअली सय्यद, शबाना आमीन खान आणि सलमा मोमीन खान हे चौघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस शिपाई कविता स्वप्नील लाड या पवई परिसरात राहत असून पवई पोलीस ठाण्यात जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे मदनीस म्हणून काम करतात. २९ जानेवारी २०२४ रोजी पवई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हत्येचा प्रयत्नासह अपहरण, खंडणीसाठी धमकी देणे या गुन्ह्यांतील आरोपी अमीन खान हा पवई परिसरातील त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पवई पोलिसांची एक टिम तिथे रवाना झाले होते. अमीनच्या घरी गेल्यानंतर तिथे सापडला नाही. यावेळी शबाना अमीन खान हिने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन धमकी देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या पथकाला ड्रग्जच्या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी मुबारक मोमीन खान ऊर्फ ऊर्फ लालू हा तिथे असल्याचे समजले होते. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते. मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. याच दररम्यान तिथे शबानाने आरडाओरड करुन इतर महिलांना बोलाविले. काही वेळात तिथे इतर तीन ते चार महिला जमा झाल्या. या महिलांनी पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मुबारकला घेऊन जाण्यास विरोध करुन धक्काबुक्की केली होती.
या गोंधळात मुबारकने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी मदिना सय्यद या महिलेने पोलीस हवालदार खांबे यांच्या कानशिलात लगावून त्यांना धक्काबुकी केली होती तर जेबाने महिला शिपाई लाड यांना मागू खेचून ढकळून जमिनीवर पाडले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन मुबारकला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. घडलेल्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संंबंधित आरोपीसह महिलांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर मिसबा ऊर्फ जेबा खान, रेश्मा खान,मुबारक खान, मदिना सय्यद, शबाना खान आणि सलमा खान या सहाजणांविरुद्ध ३५३, ३२३, १४९, १४७, १४३, ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी एका महिलेला जामिनावर सोडून देण्यात आले. मुबारक हा न्यायालयीन तर शबाना ही पोलीस कोठडीत आहे. या दोघांच्या अटकेनंतर या गुन्ह्यांत गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मिसबा ऊर्फ जेबा आणि रेश्मा खान या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.