मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – आर्थिक वादातून राजू उत्तेकर या तरुणावर त्याच्याच परिचित आरोपीने प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात राजू हा जखमी झाल्याने त्याला जवळच्या क्लिनिकमध्ये नेणार्या कल्पेश प्रकाश पावसकर याच्यावरही आरोपीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजू आणि कल्पेशला उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ओम राजेश माने या आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्पेश हा रिक्षाचालक असून तो पवईतील जेव्हीएलआर रोड, मिलिंदनगर, म्हाडा इमारतीमध्ये राहतो. राजू हा त्याचा मित्र असून त्याचे ओम मानेसोबत आर्थिक वाद होता. याच वादातून शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता ओम आणि राजू यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर रागाच्या भरात राजवर ओमने तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या गळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच कल्पेशने त्याला जवळच्या क्लिनिकमध्ये नेले होते. राजूला क्लिनिकला नेले म्हणून ओमला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने त्याच्यावरही तिक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. त्यात त्याच्या कानाला गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. कल्पेशच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ओम मानेविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या ओमला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.