मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2025
मुंबई, – पाळीव कुत्रा चावल्याने 37 वर्षांची शास्त्रज्ञ महिला गंभीर जखमी झाल्याची घटना पवई परिसरात घडली. रिचा संचित कौशिक-अरोरा असे या महिलेचे नाव असून तिच्यावर पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी पाळीव कुत्र्याचा मालक दिवेश विर्क, त्यांचा कारचालक अतुल सावंत आणि मोलकरणीवर पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्यांना फिरायला घेऊन जाताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
रिचा संचित कौशिक-अरोरा ही 37 वर्षांची महिला पवईतील सेक्टर ए, जलवायू विहार अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे पती संचित कौशिक हे भारतीय नौसेनेतून निवृत्त झाले असून सध्या ते पायलट म्हणून काम करतात. त्या स्वत ठाण्यातील एका खाजगी कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कामाला आहेत. त्यांच्या एफ ब्लॉकमधील राहत्या घराचे बांधकाम सुरु आहे. ते बांधकाम पाहण्यासाठी त्या नेहमीच जातात. रविवारी सकाळी साडेदहा वाजता नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी जात होते. यावेळी दिवेश विर्क यांचे पाळीव कुत्रे कारमधून घेऊन चालक अतुल आणि मोलकरीण स्वाती हे जात होते. यावेळी तपकिरी रंगाच्या एका कुत्र्याने त्यांच्या अंगावर धावून आला, त्यामुळे त्यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
याच दरम्यान दुसरा काळ्या रंगाचा कुत्र्याने त्यांच्या नाकावर आणि उजव्या पायावर चावा घेतला. त्यात रिचा या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना स्थानिक रहिवाशी संजय जलान आणि त्यांचे सासरे जितेंद्र शर्मा यांनी तातडीने हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथेच त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर त्यांनी घडलेला प्रकार पवई पोलिसांना सांगून पाळीव कुत्र्याचे मालक दिवेश विर्क, त्यांचा कारचालक अतुल सावंत आणि मोलकरीण स्वाती यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.