सोशल मिडीयावर फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी
तरुणीच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मे 2025
मुंबई, – सोशल मिडीयावर माजी प्रियकरासोबत खाजगी फोटोसह व्हिडीओ व्हायरल करुन एका तरुणीची बदनामीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोशल मिडीयावरुन बदनामी करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार तरुणी ही अठरा वर्षांची असून ती साकिनाका परिसरात राहते. तिच्या वडिलांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. दोन वर्षांपूर्वी तिने इंटाग्रामवर एक अकाऊंट बनविले होते. शनिवारी सकाळी अकरा वाजता तिच्या अकाऊंटवरुन काही अश्लील पोस्ट करण्यात आले होते. हा प्रकार तिच्या भावाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याने तिला विचारणा केली होती. त्यानंतर तिने तिचे अकाऊंट ओपन केले होते. त्यात तिचे काही जुने फोटोसह व्हिडीओ दिसून आले. ते फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या मित्रासोबत काढले होते. या दोघांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. यावेळी त्यांनी त्यांचे काही खाजगी फोटो आणि व्हिडीओ काढले होते. काही महिन्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले होते. त्याचाच कोणीतरी गैरफायदा घेऊन तिचे तिच्या मित्रासोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार लक्षात येताच तिने पवई पोलिसांना घडललेा प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तक्रारदार तरुणीच्या मित्राची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांच्यातील खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यामागे त्याचा सहभाग आहे का, ते फोटो व व्हिडीओ त्याने कोणाला शेअर केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत.