हॉटेलमध्ये सिनेदिग्दशिकेच्या चांदीच्या विटासह कॅशची चोरी

चोरीप्रकरणी हॉटेलच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2026
मुंबई, – पवईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना हॉटेलच्या कर्मचार्‍याने सिनेदिग्दर्शकेच्या चांदीच्या विटासह कॅश असा पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सदानंद चौबे या हॉटेलच्या 25 वर्षांच्या कर्मचार्‍याविरुद्ध पवई पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याचे उघडकीस आले असून त्याच्या अटकेसाठी पवई पोलिसांची एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रिश्भा संदीप गिरी या सिनेदिग्दर्शका असून सध्या अंधेरीतील लोखंडवाला मार्केट, ग्रीन फिल्ड सोसायटीमध्ये राहते. तिचे कुटुंबिय कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. ती सिनेमा क्षेत्रात निर्देशक म्हणून काम करते. मार्च 2025 ते मार्च 2026 या कालावधीत ती अम्मास पॅलेस या हॉटेलमध्ये भाडेतत्त्वावर कॉटबेसिसवर राहत होती. यावेळी तिने तिच्या उत्पनातून एक किलो वजनाचे दोन चांदीच्या विटा खरेदी केल्या होत्या. त्या विटा तिने तिच्या बॅगेमध्ये ठेवले होते. 10 मार्चला तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने तिच्या बॅगेची तपासणी केली होती. त्यात तिला चांदीच्या प्रत्येकी एक किलोच्या दोन चांदीच्या विटा आणि एक लाख तीस हजाराची कॅश असा सुमारे सव्वापाच लाखांचा मुद्देमाल दिसून आला नाही. त्यामुळे तिने हॉटेलच्या मॅनेजरसह कर्मचार्‍यांकडे विचारणा केली होती.

या चोरीच्या घटनेची हॉटेलच्या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली होती. यावेळी हॉटेलचा कर्मचारी सदानंद चौबे याने 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत तिच्या बॅगेतून चांदीच्या विटा आणि कॅश चोरी करताना दिसून आला होता. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा प्रकार दिसून आल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. त्यानंतर तो हॉटेलमध्ये आला नाही. त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.

काही दिवसांनी तो त्याच्या गावी पळून गेल्याचे हॉटेलच्या मॅनेजरच्या लक्षात आले होते. ही माहिती नंतर रिश्भा गिरी हिला देण्यात आली. त्यानंतर तिने पवई पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून हॉटेलचा कर्मचारी सदानंद चौबे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे. त्याच्या अटकेसाठी एक टिम त्याच्या गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page