दहा वर्षांच्या मुलावर पित्याकडून अमानुष मारहाण
पित्याविरुद्ध गुन्हा दाखल; स्थानिकांमध्ये प्रचंड संताप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 एप्रिल 2026
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला त्याच्याच पित्याने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. या मारहाणीत त्याच्या डोळयाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
34 वर्षांची तक्रारदार महिला तिचा आरोपी पती आणि दहा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत पवईतील आयआयटी मार्केट परिसरात राहते. ती घरकाम तर तिचा पती बाऊंसर म्हणून काम करतो. तिचा मुलगा याच परिसरातील एका खाजगी शाळेत शिकतो. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता ती घरकाम करुन घरी आली होती. यावेळी तिला तिचा मुलगा डोळ्याला हात लावून झोपला होता, त्याचाच शेजारी तिची मुलगी बसली होती. यावेळी तिने त्यांना काय झाले याबाबत विचारणा केली, मात्र ते दोघेही काहीच बोलत नव्हते. बराच वेळ विचारणा केल्यानंतर त्यांनी बाबांनी मारहाण केल्याचे सांगितले.
तिने मुलाकडे पाहिल्यानंतर त्याचा डोळा आणि तोंड सुजले होते. त्याला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांनी त्याला डोळ्यावर जोरात फाईट मारली, गळ्यावर लाथाने मारहाण केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिने तिच्या पतीला जाब विचारला असता त्याने तिला जास्त बोलू नकोस, शिवीगाळ करुन तुलाही बघून घेईन अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर तिने तिच्या मुलाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते.
या प्रकारानंतर तिने पार्कसाईट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.