मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – अनधिकृत झोपड्यासाठी गेलेल्या मनपा आणि पोलिसांवर दगडफेड करुन दंगल घडविणार्या आरोपीविरुद्ध पवई पोलिसांनी अटकसत्र सुरु केले आहे. याच प्रकरणात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन अवघ्या काही तासांत ५० हून अधिक आरोपींना अटक केली. अटकेनंतर या सर्वांना पोलीस बंदोबस्तात अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने सर्वांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
गेल्या काही दिवसांतील पवईतील पवई गाव आणि मौजे तिरंदाज परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आले होते. जवळपास ५०० हून अधिक झोपड्या अनधिकृत होत्या. शासकीय जागेवर कब्जा करुन त्या अनधिकृत झोपड्या बांधण्यात आले होते. त्याची मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत महानगरपालिकेला या झोपड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मनपाकडून ही कारवाई होण्यापूर्वी संबंधित झोपडीधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. गुरुवारी सकाळी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथक तिथे कारवाईसाठी गेले होते. या कारवाईदरम्यान तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पवई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र कारवाई सुरु असताना स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवून मनपासह पोलिसांवर अचानक दगडफेक सुरु केली होती. संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकार्यासह कर्मचार्यावर रॉकेल, मिरचीचे पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या दगडफेकीत मनपाचे पाच अभियंता, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस असे २५ जणांना दुखापत झाली होती. दगडफेकीच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी विरोध करणार्या स्थानिक रहिवाशांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दगडफेकीमुळे मनपाची कारवाई थांबली होती.
याप्रकरणी कनिष्ठ अभियंता रोहन शेरावते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्याचंी नोंद केली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ५० जणांना अटक केली. अटकेनंतर या सर्वांना शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडीऐवजी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली. दुसरीकडे विकासकाकडून पैसे घेतल्याचा आरोप करुन एका जमावाने एका महिलेवर हल्ला केला. यावेळी महिला पोलीस आश्विनी ढमढरे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र या जमावाने तिच्या दिशेने बादल्या फेंकून मारुन तिला एका रुममध्ये कोंडून ठेवले होते. हा प्रकार अन्य पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला बाहेर काढले. दरम्यान जमावाच्या मारहाणीत ही महिला आणि तिची तीन वर्षांची मुलगी जखमी झाली होती. गुरुवारच्या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तिथे पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.