शंभर रुपयांच्या वादातून बिगारी कामगारावर प्राणघातक हल्ला

पवईतील घटना; हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – शंभर रुपयांच्या वादातून राजबहादूर दिलीपबहादूर साही या ४५ वर्षांच्या बिगारी कामगाराची त्याच्याच मित्राने धारदार कटरने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात राजबहादूरच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्यावर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत दिलीप रामभाऊ आव्हाड या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीपने राजबहादूरने त्याच्याकडून उसने शंभर रुपये घेतल्याचा आरोप केला तर राजबहादूरने त्याच्याकडून पैसे घेतले नसल्याचे पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

ही घटना २० ऑगस्टला मंगळवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास पवईतील म्हाडा, मिलिंदनगरच्या इमारत क्रमांक नऊसमोर घडली. याच परिसरात राजबहादूर आणि दिलीप हे राहत असू एकमेकांच्या परिचित आहेत. राजबहाूदर हा बिगारी कामगार तर दिलीप हाऊसकिपिंगचे काम करतो. काही दिवसांपूर्वी दिलीपने त्याला शंभर रुपये दिले होते. मात्र वारंवार पैशांची मागणी करुनही राजबहादूर त्याला शंभर रुपये परत करत नव्हता. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. मंगळवारी सायंकाळी चार वाजता या दोघांमध्ये पैशांवरुन शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यातून रागाच्या भरात दिलीपने राजबहादूरच्या गळ्यावर धारदार कटरने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याला घरी पाठविण्यात आले होते. घडलेला प्रकार नंतर राजबहादूरने पवई पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिलीप आव्हाड याच्याविरुद्ध १०९ (१), ३५१ (३), ११५ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पवईतील राहत्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page