मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोन तरुणांवर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. या हल्ल्यात रिषू श्रीवास्तव आणि त्याचा मित्र हर्षद नामवाड हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच नझीम खान आणि मोहम्मद मैनुद्दीन खान ऊर्फ ख्वाजा या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी ३० ऑगस्टला रात्री साडेनऊ वाजता पवईतील तुंगा, शिवशक्ती नगर रोड, डायमंड चायनिज दुकानासमोर घडली. जखमी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी नझीम आणि मोहम्मद मैनुद्दीनने रिषूकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते, मात्र त्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला होता. या कारणावरुन या दोघांनी त्याच्याशी भांडण करुन त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी हर्षदने मध्यस्थी करुन दोघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने त्यांनी त्याच्यावरही तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाल्याने त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी रिषूचा चुलत भाऊ सुरज विमल श्रीवास्तव याच्या तक्रारीवरुन पवई पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. ं