मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – वयोवृद्ध मावशीसह चुलत बहिणीचे मॉर्फ केलेले अश्लल फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामीचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३० वर्षांच्या भाचीविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमागील कारणाचा खुलासा झाला नसला तरी कौटुंबिक वादातून तिने या दोघींची बदनामी केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या घटनेची पवई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी भाचीला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे सांगितले.
६४ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला तिचा पतीसह दोन मुलांसोबत पवई परिसरात राहते. तिचे पती व्यावसायिक असून त्यांची एक खाजगी कंपनी आहे. तिला दोन बहिणी असून एक बहिण अंधेरी तर दुसरी बहिण बोरिवली परिसरात राहते. बोरिवली येथे राहणार्या बहिणीच्या पतीचे जुलै २०२१ रोजी निधन झाले असून तिची मुलगी ही या गुन्ह्यांतील आरोपी आहे. काही दिवसांनी तिने तक्रारदार महिलेसह तिच्या दुसर्या भाचीचे काही मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित मॉर्फ फोटो तिने तिच्या पतीसह भावाला पाठविले होते. सुरुवातीला कौटुंबिक कारणावरुन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. १२ सप्टेंबरला तक्रारदार महिलेच्या मुलाला तिने पुन्हा त्यांचे काही मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठविले होते. त्यात तक्रारदारासह तिच्या अंधेरीतील भाचीच्या चेहरे अश्लील मॉर्फ केलेल्या फोटोवर हार लावून त्याच्या शेजारीच त्याचा फोटो लावण्यात आला होता.
या फोटोसोबत तिने काही अश्लील मॅसेज पाठविले होते. बहिणीच्या मुलीकडून तिच्यासह दुसर्या भाचीची सतत बदनामीचा प्रयत्न सुरु राहिल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला होता. तसेच तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याची कल्पना दिली होती. त्यानंतर शुक्रवारी या महिलेने पवई पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी भाचीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पवई पोलिसांनी गंभीर दखल घेत ३० वर्षांच्या आरोपी भाचीविरुद्ध ३५२, ३५६ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच आरोपी तरुणीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.