मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – पवईतील एका नामांकित खाजगी कंपनीचा ईमेल हॅक करुन अज्ञात सायबर ठगांनी कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे 11 कोटीचा अपहार केला, हा प्रकार कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्याच्या लक्षात येताच त्याने सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केली, या तक्रारीनंतर काही तासांत फसवणुक झालेली सर्व रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. याबाबत जनजागृती करुनही सायबर ठगांकडून काही लोकांची फसवणुक केली जात आहे. विविध युक्त्या लढवून सायबर ठगांकडून संबंधित व्यक्तीसह विविध व्यावसायिक कंपन्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. अशीच एक घटना गुरुवारी दुपारी पवई परिसरात घडली. याच परिसरात एक नामांकित कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीच्या एका पदाधिकार्याला दुपारी त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या बँक खात्याशी जोडलेला ईमेल आयडी हॅक केल्याचे दिसून आले. त्यानंतर या ठगांनी बँकेशी संपर्क साधून त्यांना मेल पाठविला होता. त्यात त्यांना दोन वेगवेगळ्या बँक खात्यात 11 कोटी 34 लाख 85 हजार 258 रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
बँक मॅनेजरची दिशाभूल करुन त्यांना संबंधित बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर सेलच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगून मदत करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक निवृत्ती बावस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागराळ, पोलीस उपनिरीक्षक राऊळ, कक्कड व अन्य पोलीस पथकाने तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना संबंधित बँक खात्यात व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती.
या विनंतीनंतर या अधिकार्यांनी संबंधित दोन्ही बँक खात्यातील व्यवहार थांबवून ही रक्कम फ्रिज केली होती. तक्रार प्राप्त होताच या अधिकार्यांना 11 लाख 19 लाख 50 हजार 501 रुपयांची कॅश गोठविण्यात यश आले. ही रक्कम आता कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. तक्रारीनंतर सायबर सेल पोलिसांनी तातडीने हालचाल करुन कंपनीची अपहार झालेली रक्कम वाचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे तक्रारदारासह कंपनीच्या मालकांनी सायबर सेल पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे. याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.