मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – भविष्यासाठी ठेवलेल्या एफडीच्या रकमेवर ठगाने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. एफडीची मुदत संपत असल्याने त्याने ऑनलाईनवर नंबर सर्च केला. ठगाने तो बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून ५ लाख ३० हजार रुपयाची फसवणूक केली. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.
पवई येथे राहणारे तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहे. ते एका विमान कंपनीत निवृत्त झाले आहेत. त्याने एका बँकेत १५ लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले होते. त्या एफडीची मुदत संपणार होती. मुदत संपल्यानंतर ते पैसे दुसऱ्या बँक खात्यात त्याना वर्ग करायचे होते. त्यासाठी त्याने ऑनलाईनवर एका सरकारी कॉल सेंटरचा नंबर शोधला. त्या नंबरवर त्याने फोन केला. ठगाने त्याची माहिती घेऊन काही वेळाने पुन्हा दुसऱ्या नंबरवरून फोन केला. त्याने त्याचे नाव सांगून तो बँकेच्या कस्टमर केअर विभागातून बोलत असल्याचे भासवले. त्या दरम्यान तक्रारदार याने एफडी ची रक्कम वर्ग करण्या बाबत विचारणा केली. तेव्हा ठगाने त्याना व्हाट्स अप वरून एक एपिके ही फाईल पाठवली. ती फाईल उघडून अप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्याने ते अप्स डाऊन लोड केले. त्याच्या एफडी चे पैसे जमा झाले नव्हते.
दुसऱ्या दिवशी त्याना बँकेचा मेसेज आला. नेट बँकिंगचा वापर करून त्याच्या खात्यातून ४ लाख ८० हजार आणि ५० हजार रुपये काढल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने फोन तपासला. तेव्हा त्याच्या फोन मधील मेसेज फॉरवर्ड होत होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.