अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करताना हल्ला

हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस जखमी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मे 2025
मुंबई, – पवईतील जेव्हीएलआर रोड, साययकल ट्रकवर अनधिकृतपणे फेरीवाल्याविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पोलीस ठाण्याच्या पथकावर फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक राकेश शंकर नलावडे, पोलीस हवालदार वगरे आणि पोलीस शिपाई घाडगे जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी हल्ला करणार्‍या चारही फेरीवाल्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर किशलकुमार कटारिया या 31 वर्षांच्या फेरीवाल्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पवईतील जेव्हीएलआर रोड, म्हाडा वसाहत, मिलिंदनगरच्या सायकल ट्रकवर घडली. राकेश नलावडे हे पवईतील जेव्हीएलआर रोड, माऊंटन ब्रीझ अपार्टमेंटमध्ये राहत असून पवई पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी पवई पोलिसांचे एक विशेष पथक सायकल ट्रकवर बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाईसाठी गेले होते. यावेळी उपनिरीक्षक राकेश नलावडे यांच्यासोबत पोलीस हवालदार वगरे आणि पोलीस शिपाई घाडगे होते. यावेळी फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करताना किशलकुमार या फेरीवाल्याने पोलीस शिपाई घाडगे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या पायावर लाकडी काठीने जोरात फटका मारला. तसेच त्याने इतर फेरीवाल्यांना चिथावणी देऊन पोलिसांची ही कारवाई हाणून पाडण्यास सांगितले. त्यामुळे इतर तिघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता.

या फेरीवाल्यांनी पुन्हा पोलीस शिपाई घाडगे यांना पकडून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी उपनिरीक्षक राकेश नलावडे आणि पोलीस हवालदार वगरे यांनी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग आल्याने या फेरीवाल्यानंतर इतर पोलिसांवर काठीने हल्ला चढविला होता. इतकेच नव्हे जिवे मारण्याची धमकी देत एका फेरीवाल्याने लोखंडी रॉडने पोलीस हवालदार वगरे यांच्य डोक्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी हा वार चुकविला, त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अनधिकृत स्टॉल लावणार्‍या फेरीवाल्यांनी पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तिथे पवई पोलिसांच्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी धाव घेतली होती.

यावेळी पोलिसांवर हल्ला करणार्‍या किशलकुमार याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी राकेश नलावडे यांच्या तक्रारीवरुन संबंधित चारही फेरीवाल्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ, प्राणघातक हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच किशलकुमार कटारिया याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक राकेश नलावडे यांच्या पाठीला, पोलीस शिपाई घाडगे यांच्या डाव्या पायाला तर पोलीस हवालदार वगरे यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पॅरामाऊंट आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते.

या घटनेी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेनंतर इतर तीन फेरीवाला पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आरोपी परप्रांतिय असून गेल्या काही महिन्यांपासून तिथे अनधिकृतपणे फेरीवाला म्हणून काम करतात. त्यांच्यावर कारवाई करताना त्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत आहे. या फेरीवाल्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश पवई पोलिसांना देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page