पंधरा वर्षांच्या मुलीवर आत्येभावाकडून लैगिंक अत्याचार
सोळा वर्षांच्या भावाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑगस्ट २०२४
मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच आत्येभावाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना पवई परिसरात घडली. ही मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोळा वर्षांच्या अल्पवयीन भावाविरुद्ध पवई पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत पवई परिसरात राहत असून सध्या शिक्षण घेत आहे. आरोपी तिच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा असून काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन जून २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे मेडीकल चेकअप केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. याबाबत आईने विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पालकांच्या सल्ल्यानंतर तिने पवई पोलिसांत आरोपी भावाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध ३७६, ३७६ (२), (छ) भादवी सहकलम ४, ५ (जे), (२), ६ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. नात्यालाच काळीमा फासणार्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पिडीत मुलीला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत.