मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ सप्टेंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच आतेभावाने लैगिंक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी २० वर्षांच्या आतेभावाविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून हा तपास पवई पोलिसांकडे वर्ग केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून केलेल्या अत्याचारामुळे ही मुलगी गरोदर राहिली असून तिच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.
चौदा वर्षांची मुलगी अंधेरीतील जुहू गल्लीत राहत असून २० वर्षांचा आरोपी तिचा आतेभाऊ आहे. तो चालक म्हणून काम करत असून सध्या पवई परिसरात वास्तव्यास आहे. ऑक्टोंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत ती तिच्या आत्याच्या घरी राहत होती. यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती प्राप्त होताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुलीची जबानी नोंदविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आतेभावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पवई पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या भावाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.