आयआयटीच्या विद्यार्थ्यांची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या
आत्महत्या की अपघात याचा पोलिसांकडून तपास सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – आयआयटीच्या एका 23 वर्षांच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या दहाव्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जाते. रोहित सिन्हा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा रहिवाशी आहे. त्याच्याकडे पवई पोलिसांना सुसायट नोट मिळाली नाही. दरम्यान रोहितच्या सहकारी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी रोहित आत्महत्येच्या मनस्थितीत आहे असे कोणालाही वाटले नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की अपघाती मृत्यू आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. रोहितच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून ते मुंबईत येण्यासाठी निघाले आहेत.
रोहित हा मूळचा दिल्लीचा रहिवाशी असून त्याचे संपूर्ण कुटुंबिय तिथे राहतात. रोहित हा त्याच्या पुढील शिक्षणासाठी पवईतील आयआयटीमध्ये आला होता. मुंबई शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने तो त्याच्या सहकारी मित्रांसोबतच वसतीगृहात राहत होता. मेटा सायन्सचा बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. मात्र डिसेंबरपूर्वीच नोकरी भरतीची प्रक्रिया सुरु होणार नव्हती. त्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. शुक्रवारी रात्री त्याने त्याच्या मित्रांसोबत जेवण केले. त्यानंतर ते सर्वजण टेरेसवर गेले होते. तिथे काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्याचे सहकारी झोपण्यासाठी रुममध्ये गेले. मात्र रोहित तिथेच थांबला होता.
रात्री उशिरा तो टेरेसवरुन खाली पडल्याची माहिती त्याच्या सहकार्यांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या रोहितला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या घटनेनंतर रोहितच्या सहकार्यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून ते सर्वजण शुक्रवारी रात्री टेरेसवरन गेल्याचे आणि नंतर रोहित तिथे एकटाच राहिला होता असे उघडकीस आले. मानसिक तणावामुळे आलेल्या नैराश्यातून रोहितने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. मात्र त्याने आत्महत्या केली की त्याचा अपघात झाला याचा आता पोलिसांनी स्वतंत्रपणे तपास सुरु केला आहे.
याप्रकरणी एडीआरची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबियांची पोलिसांकडून लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून काही गोष्टींचा खुलासा होईल असे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. दरम्यान आयआयटी संस्थेने एक निवेदन जारी केले असून त्यात रोहितच्या अकाली निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आले आहे. त्याच्या अचानक निघून जाण्याने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्याच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. या संपूर्ण प्रकरणाची पवई पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. रोहितच्या मृत्यूने त्याच्या सहकार्यांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला होता. आयआयटी वसतीगृहात शोककळा पसरली होती.