पवई येथे वीस लाखांची कॅश चोरी करुन कारचालकाचे पलायन

मालक बँकाँकला गेल्याची सधी साधून हातसफाई केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – पवई येथे एका 29 वर्षांच्या कारचालकाने त्याच्याच मालकाच्या घरी वीस लाखांची चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुभम सुखदेवराव घाटे असे या कारचालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मालक बँकाँकला गेल्याची संधी साधून शुभमने त्यांच्या घरात प्रवेश करुन हातसफाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही घटना पवईतील सोमवार 10 ऑक्टोंबरला साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास पईतील फेज टू, लेक होम, लेक प्लेझंट सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक सी/1803 मध्ये व्यावसायिक विजयकुमार लालता सिंह हे एकटेच राहत असून त्यांचे कुटुंबिय नाशिक येथे राहतात. त्यांचा टॅक्स अ‍ॅण्ड फायानान्सशी संबंधित व्यवसाय आहे. कामानिमित्त त्यांना नेहमी नाशिक येथे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी शुभम घाटे याला चालक म्हणून नोकरीस ठेवले होते. शुभम हा मूळचा वर्धा येथील रसुलाबादचा रहिवाशी असून सध्या तो नाशिकच्या सिडको, पाटीलनगरात राहत होता.

15 सप्टेंबर 2025 पासून तो त्यांच्याकडे कामावर होता. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहत होता. 6 नोव्हेंबरला ते बँकाँक येथे फिरायला गेले होते. यावेळी शुभम त्यांना सोडण्याठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्यामुळे त्यांनी घरासह त्यांच्या बीएमडब्ल्यू कारची चावी त्याच्याकडे दिली होती. सोमवार 10 नोव्हेंबरला ते बँकाँकहून मुंबईत आले होते, यावेळी त्यांनी शुभमला कॉल केला, यावेळी त्याच्या एका मित्राने कॉल घेऊन शुभमचा अपघात झाला आहे. त्याला ठाण्यातील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयातील पवन याला तिथे बोलावून घेतले होते.

घरी गेल्यानंतर त्यांनी पवनला सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये शुभमची विचारपूस करण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर ते त्यांच्या घरी आराम करत होते. रात्री एक वाजता पवनने त्यांना कॉल करुन तिथे शुभम नावाचा कोणीही पेशंट अ‍ॅडमिट नसल्याचे सांगितले. रात्री ते कपाटातील घड्याळ काढत होते. यावेळी त्यांना त्यांच्या ड्राव्हरमधील तीसपैकी वीस लाखांची कॅश मिसिंग असल्याचे दिसून आले. दहा लाखांची कॅश तिथे होती, मात्र वीस लाख रुपये तिथे नव्हते. त्यामुळे त्यांनी संपूर्ण कपाटाची पाहणी केली, मात्र त्यांना वीस लाखांची कॅश कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडे शुभमविषयी चौकशी केली होती. यावेळी सुरक्षारक्षकाने 10 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊ वाजता शुभम आला होता.

पंधरा मिनिटानंतर तो परत आला होता, त्याच्याकडे दोन बॅग होते. त्यांची बीएमडब्ल्यू कार त्याने पार्किंगमध्ये पार्क करुन ओला कारमधून निघून गेल्याचे सांगितले. घरात कोणी नसताना शुभम याने कपाटातील वीस लाखांची कॅश चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुभम घाटेविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page