क्रेडिटवर घेतलेल्या मेटल मालाचे पेमेंट न करता फसवणुक
ग्रँटरोड येथील घटना; दोन व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ जुलै २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या मेटल मालाचे पेमेंट न करता एका व्यावसायिकाची सुमारे एक कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार ग्रँटरोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीप्रकरणी दोन व्यावसायिकाविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुकुमार घोष आणि सोमदिप घोष अशी या दोघांची नावे असून ते दोघेही ठाण्यातील रहिवाशी आहे. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनोज लालचंद मेहता हे मेटल व्यावसायिक असून गिरगाव परिसरात राहतात. त्यांचा ग्रँटरोड येथील दहावी खेतवाडी मेन रोडवर एक मेटल शॉप आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांची सुकुमार आणि सोमदिप घोष यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही मेटल व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांची चांगली मैत्री झाले होते. त्यांनतर त्यांच्यात मेटल खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. एप्रिल २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत त्यांनी त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रुपयांचे मेटल क्रेडिटवर घेतले होते. मात्र त्यांच्याकडून त्यांना पेमेंट करण्यात आले होते. याबाबत विचारणा करुनही त्या दोघांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. या दोघांनी मेटलची परस्पर इतर व्यावसायिकांना विक्री करुन त्यांची कंपनी बंद केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सुकुमार आणि सोमदिप घोष यांच्याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.