लोअर परेल येथे पोलीस अंमलदाराच्या मुलाची आत्महत्या
सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जानेवारी २०२५
मुंबई, – लोअर परेल येथे एका पोलीस अंमलदाराच्या २० वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून त्याने जीवन संपविले. हर्ष संतोष मस्के असे मुलाचे नाव असून त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याचा मृतदेह शवविचछेदनासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी ना. म जोशी मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. हर्षच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता ना. म जोशी मार्ग, सेंच्युरी म्हाडा कॉलनीत घडली. याच कॉलनीत संतोष मस्के हे त्यांच्या कुटुंबियासोबत राहतात. ते पोलीस पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सध्या त्यांची पोस्टिंग विशेष संरक्षण विभागात आहे. ते प्रभादेवी येथील बड्या राजकीय नेत्याच्या सुरक्षेसाठी तैनात होते. त्यामुळे त्यांना एक सर्व्हिस रिव्हॉल्व्हर देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच ते कामानिमित्त गावी गेले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घरात ठेवले होते. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता हर्ष हा सर्व्हिस रिव्हॉल्व्हर घेऊन बाथरुममध्ये गेला आणि त्याने बाथरुममध्ये स्वतवर गोळी झाडली होती.
अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने त्याच्या कुटुंबातील सदस्यासह शेजार्यांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी त्यांना हर्षने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचे समजले. ही माहिती मिळताच ना. म जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या हर्षला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे हर्षने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. याप्रकरणी मस्के कुटुंबियांसह त्याच्या मित्रांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भांडुप येथे तरुणाने गावठी कट्ट्याने गोळी झाडली
भांडुप येथील अन्य एका घटनेत एका २३ वर्षांच्या तरुणाने गावठी कट्ट्याने गोळी झाडून स्वतचे जीवन संपविले. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास भांडुप येथील एकतानगर परिसरात ही घटना घडली. साहिल फहीम कुरेशी असे मृत तरुणाचे नाव असून तो याच परिसरात राहत होता. त्यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय होता. सकाळी त्याचे वडिल कामावर निघून गेले होते. यावेळी साहिल हा एकटाच घरात होता. काही रवेळानंतर त्याने गावठी कट्ट्याने स्वतवर एक गोळी झाडली होती. त्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या साहिलला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. साहिलकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. मात्र साहिल काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. त्याने गावठी कट्टा कोठून आणला, त्याला तो कट्टा कोणी दिला याचा पोलीस तपास करत आहे. आत्महत्येचा त्याने व्हिडीओ बनविला होता, मात्र याबाबत पोलिसांनी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला.