मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – चारकोप पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विलास बबन टेकवडे यांचे कांदिवलीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, अत्यत मनमिळावू आणि लोकांच्या मदतीला धावणारा पोलीस कर्मचारी म्हणून विलास टेकवडे हे पोलीस दलात परिचित होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुण्यातील राहत्या गावी त्यांच्यावर अंत्ससंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.
विलास टेकवडे हे १९९७ साली मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले होते. विविध पोलीस ठाण्यात काम केल्यानंतर त्यांची एमएचबी पोलीस ठाण्यातून चारकोप पोलीस ठाण्यात बदली झाली होती. सध्या ते तिथेच पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. ते त्यांच्या आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत कांदिवलीतील पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांची मोठी मुलगी बारावी तर मुलगा सातवी शिकतो. त्यांना तीन भाऊ असून ते तिघेही पोलीस दलात कामाला होते. त्यांच्या एका भावाचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी विलास यांना काविळ झाली होती. औषधोपचार करुनही त्यांच्या प्रकृती सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कांदिवलीतील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. उपचार सुरु असताना गुरुवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह चारकोप पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलातील मित्र आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली होती. विलास हे पुण्याचे रहिवाशी असून त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्यावर पार्थिवावर अंत्ससंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले. अत्यंत मनमिळावू आणि नेहमीच लोकांच्या मदतीला धावणारा पोलीस कर्मचारी म्हणून विलास हे ओळखले जात होते. त्यांचे सर्वांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली होती.