त्या पोलीस शिपायावर विषारी इंजेक्शनने हल्ला झालाच नाही
फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये विषारी द्रव्य सापडले नाही
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मे २०२४
मुंबई, – लोकलने प्रवास करताना माटुंगा-सायन रेल्वे स्थानकादरम्यान हातावर फटका मारुन मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या चोरट्याचा पाठलाग करताना तीन ते चारजणांच्या एका टोळीने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिपाई विशाल पाटील यांचा मृत्यू झाला होता, मात्र विशाल पाटीलवर विषारी इंजेक्शनने हल्ला झाला नसल्याचे त्याच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवरुन उघडकीस आले आहे. या रिपोर्टमध्ये विशाल पाटील यांच्या शरीरात विषारी द्रव्य सापडले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, त्याने त्याच्या त्याच्या मित्रांना खोटी माहिती का दिली होती याचा तपास करुन रेल्वे पोलीस लवकरच लोकल कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करणार आहे.
ठाणे येथे राहणारा विशाल पाटील हा मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होता. सध्या त्याची नियुक्ती एल तीनमध्ये होती. २७ एप्रिलला दिवसपाळीची ड्यूटी संपवून तो रात्रीच्या वेळेस ठाण्यातील घरी जाण्यासाठी निघाले होते. प्रवासदरम्यान लोकलच्या दरवाज्याजवळ विशाल हा मोबाईलवर बोलत होता. ही लोकल माटुंगा-सायन रेल्वे स्थानकादरम्यान स्लो झाली होती. त्याचाच फायदा घेऊन एका अज्ञात चोरट्याने त्याच्या हातावर जोरात फटका मारला. त्यामुळे त्याचा मोबाईल खाली पडला. लोकल स्लो असल्याने त्याने चालत्या लोकलमधून उडी घेऊन मोबाईल चोरी करणार्या आरोपीचा पाठलाग सुरु केला होता. रात्रीच्या अंधारात पाठलाग करुन त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे आलेल्या त्याच्या इतर सहकार्याने त्याच्या पाठीवर विषारी इंजेक्शन मारले. तसेच त्याच्या तोंडावर लाल रंगाचे द्रव्य ओतले होते. त्यामुळे विशाल हा बेशुद्ध झाला. जवळपास बारा तासाने तो शुद्धीवर आला आणि घरी गेला. त्याने त्याच्या सहकार्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. मात्र घरी आल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विशालला त्यांच्या मित्रांनी ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी ३९२, ३९४, ३२८, ३४ भादवी (संगनमताने जबरी चोरी करताना विषारी द्रव्य पाजून गंभीर दुखापत करणे) या कलमांतर्गत गुन्हा नोंद केला होता.
हा गुन्हा नंतर दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच रेल्वे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नव्हता. त्याने त्याच्या मित्राला मोबाईल चोरीसह चोरट्याकडून त्याला विषारी इंजेक्शन मारल्याची दिलेली माहिती बोगस असल्याचे उघडकीस आले होते. २७ एप्रिलला विशाल हा दादर येथील एका बारमध्ये गेला होता. त्यानंतर तो दादर येथून परळ रेल्वे स्थानकापर्यंत चालत गेला होता. तिथेच तो रात्रभर झोपला. दारु पिण्यासाठी त्याने त्याच्या सोन्याची अंगठीची विक्री केली होती. ठाण्यात आल्यानंतर त्याने पुन्हा मद्यप्राशन केले होते. अतिरिक्त मद्यप्राशन केल्यानंतर त्याला रात्री उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्याला दुसर्या दिवशी उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. अलीकडेच रेल्वे पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची माहिती काढली होती. त्यात त्याने वाईन शॉप आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी एक नमुना तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला होता. त्याचा अहवाल रेल्वे पोलिसांना देण्यात आला. त्यात त्याच्या शरीरात विषारी द्रव्य सापडले नाही. त्याचा त्याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दादर रेल्वे पोलिसांकडून लोकल कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला जाणार आहे.