महिला चित्रपट निर्मात्याची 1.33 कोटीची फसवणुक

मायलेकीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – अंधेरीतील एका महिला चित्रपट निर्मात्या महिलेची 1 कोटी 33 लाख रुपयांची आर्थिक फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या प्रेरणा विरेंद्र अरोरा व तिची आई प्रोतिमा विरेंद्र अरोरा या मायलेकीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रेरणा ही फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार महिला असून तिने चित्रपटासाठी अनेक निर्मात्याकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिला अटक झाली असून सध्या ती जामिनावर बाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कशिश ऊर्फ नफिसा पलटू खान ही तक्रारदार महिला चित्रपट निर्माती असून अंधेरीतील न्यू म्हाडा परिसरात राहते. 2018 रोजी तिची प्रेरणा अरोरासोबत ओळख झाली होती. यावेळी तिने ती स्वतला निर्माता-दिग्दर्शक असल्याचे सांगून तिने अनेक मोठ्या चित्रपट प्रोजेक्टमध्ये अक्षयकुमार, जॉन अब्राहम, ऐश्वर्या रॉय यांच्यासोबत काम केले आहे. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही दिवसांनी तिने कशिशला तिच्याकडे साठ कोटीची एफडी असून ती कर्ज घेऊ शकत नाही. तिला तिच्या चित्रपटासाठी आर्थिक मदतीची गरज असून तिने तिला मदत करावी. या मदतीसाठी ती तिला चांगला परतावा देईल असे आश्वासन दिले होते. त्यावेळेस प्रेरणा ही बत्ती गुल मीटर चालू आणि फन्ने खान आदी दोन चित्रपटाच्या निर्मितीच्या कामात व्यस्त होती. तिने तिला फन्ने चित्रपटासाठी 50 लाखांची मदत करण्यास सांगून त्यामोबदल्यात ती तिला अतिरिक्त दहा लाख रुपये देईल असे सांगितले होते.

इतकेच नव्हे तर या चित्रपटात तिला सहनिर्माता म्हणून नाव देईल. चित्रपटाच्या प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे मार्च 2018 साली तिने तिला 50 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. करारानंतर तिने तिला साठ लाखांचा एक धनादेश दिला होता. 2019 साली चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिचे नाव सहनिर्माता म्हणून नव्हते. तसेच तिने तिला चित्रपटाच्या प्रॉफिटमधून पाच टक्के कमिशन दिले नाही. तिने दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. या प्रकारानंतर तिने तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती चित्रपट निर्मितीसाठी बाहेरगावी असल्याने तिचा संपर्क झाला नाही. काही दिवसांनी प्रेरणा ही तिची आई प्रोतिमासोबत तिच्या घरी आली.

यावेळी तिने तिच्या साठ कोटीची एफडी दाखवून तिचे पैसे बुडणार नाही, तिला तिचे पैसे व्याजासहीत परत करु असे आश्वासन दिले होते. तिच्या वडिलांची तब्येत ठिक नसल्याने थोडा वेळ लागल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केा. त्यानंतर तिने तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली. यावेळी कशिशने तिला कॅश स्वरुपात 50 लाख रुपये दिले होते. याच दरम्यान या दोघींनी पार्टनरशीपमध्ये स्टुडिओ फाईव्ह फेलिमेंट नावाची एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीत कशिश पैशांची गुंतवणुक करणार तर प्रेरणा ही कंपनीसाठी काम घेऊन येईल असे त्यांच्यात कामाचे वाटप करण्यात आले होते.

या कंपनीमार्फत कशिशने प्रेम सोनी यांना राधा क्यू गोरी मे क्यू काला या चित्रपटासाठी 33 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. ही रक्कम तिला न सांगता प्रेरणाने नंतर काढून घेतले होते. चित्रपटासाठी कशिशने प्रेरणा, तिची आई प्रोतिमा यांना तीन वेळा 1 कोटी 33 लाख रुपये दिले होते, मात्र तिने तिला कुठलाही परतावा दिला नाही किंवा मूळ रक्कम परत केली नव्हती. याच दरम्यान तिला प्रेरणाने कंपनीसाठी दिलेल्या पैशांचा स्वतवर खर्च केल्याचे समजले होते. तिच्यासह प्रेरणाने वासू भगनानी, अनिल गुप्ता, हितेश ठक्कर आदी बड्या निर्मात्यांकडून चित्रपटासाठी आर्थिक मदत घेऊन त्यांची फसवणुक केली होती. या फसवणुकीबाबत तिच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल होते.

याच गुन्ह्यांत तिला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर तिने प्रेरणाकडून पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र तिने तिला पैसे परत केले नाही. तिने दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कशिश खानने वर्सोवा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रेरणासह तिची आई प्रोतिमा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page