बहिणीच्या लग्नासाठी मालकाच्या पिकअप वाहनाची चोरी

चोरीच्या पिकअप वाहनासह माजी कर्मचार्‍याला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने मालकाच्या पिकअप वाहनाची चोरी करुन पळून गेलेल्या एका माजी कर्मचार्‍याला आरे पोलिसांनी अटक केली. ब्रजेशकुमर रामगोपाल रेकवार ऊर्फ टायगर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी सव्वाचार लाखांचा चोरीचा पिकअप वाहन ताब्यात घेतला आहे. चोरीनंतर त्याने पिकअप वाहन नाशिक रेल्वे स्थानकात पार्क केला होता, प्रकरण शांत झाल्यानंतर तो पिकअप वाहन विक्री करुन त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी निघून जाणार होता असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी सांगितले.

रणजीतकुमार राजेदव मिश्रा हे मालाड येथे राहत असून त्यांचा डेकोरेशन साहित्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी त्यांच्या भावाने व्यवसायासाठी एक पिकअप वाहन खरेदी केला होता. रात्री ते पिकअप वाहन रणजीतकुमार हे गोरेगाव येथील आरे कॉलनी, युनिट 31, अंबावाडी परिसरात पार्क करत होते. 17 जानेवारीला त्यांनी नेहमीप्रमाणे पिकअप वाहन अंबावाडीजवळ पार्क केली होती. दुसर्‍या दिवशी ते तिथे गेले असता त्यांना त्यांची पिकअप वाहन दिसून आली नाही. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने वाहनाची चोरी करुन पलायन केल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध वाहन चोरी केल्याप्रकरणी तक्रार केली होती.

याप्रकरणी वाहनचोरीचा गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, गणेश पाटील, बरकडे, पवार यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने गोरेगाव येथील संतोषनगर परिसरातून टायगरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत टायगर हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो रणजीतकुमार यांच्याकडे पूर्वी कामाला होता. मात्र नंतर त्याने नोकरी सोडून दिली होती. त्यानंतर त्याने काही वेबसिरीजसह मालिकांमध्ये काम केले होते. मात्र नंतर त्याला काम मिळणे बंद झाले होते. त्यामुळे त्याने ट्रक आणि टेम्पोमध्ये चालक म्हणून नोकरी सुरु केली होती. ही नोकरी त्याला जास्त काळ टिकवता आली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. त्यातच त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. बहिणीच्या लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी रणजीतकुमार यांच्या पिकअप वाहनाची चोरी करण्याची योजना बनविली होती.

ठरल्याप्रमाणे 17 जानेवारीला रात्री उशिरा तो अंबावाडी परिसरात आला होता. त्याने त्यांची पिकअप वाहन चोरी करुन नाशिक येथे आणली. नाशिक रेल्वे स्थानकात वाहन पार्क केल्यानंतर तो काही दिवस शांत बसला होता. रणजीतकुमार यांनी पोलिसांत तक्रार केल्याची माहिती त्याला समजली होती. त्यामुळे प्रकरण शांत होईपर्यंत त्याने वाहनाची विक्रीची योजना थांबवली होती. या वाहनांची दिड ते दोन लाखांमध्ये विक्री करुन तो पैसे घेऊन उत्तरप्रदेशला त्याच्या गावी जाणार होता.

मात्र त्यापूर्वीच त्याला आरे पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन ताब्यात घेतले आणि या वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश केला. नाशिक येथून चोरीची पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अटकेनंतर टायगरला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page