खडा खरेदी करुन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक

१३ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – खडा खरेदी करुन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन आठवड्याला सहा टक्के व्याजदराचे गाजर दाखवून अनेक गुंतवणुकदारांची एका खाजगी कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. या कंपनीच्या दादर शाखेत अनेकांना गुंतवणुक केली असून या गुंतवणुकदारांची आतापर्यंत १३ कोटी ४८ लाखांची फसवणुक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी दादरच्या कार्यालयात सोमवारी एकच गोंधळ घातल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिवाजी पार्क पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गुंतवणुकदार शांत झाले आणि त्यांनी कंपनीच्या संचालकासह पाचजणांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्वस्थापक तानिया कॅसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हॅलेंटीना कुमार यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच एमपीआयडी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते सर्वजण पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

३१ वर्षांचे प्रदीपकुमार मामराज वैश्य हे खार परिसरात राहत असून त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. जून २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुक केली होती. या कंपनीचे दादर येथील जे. के सावंत मार्ग, टोरेस वस्तू सेंटर इमारतीमध्ये एक कार्यालय आहे. कंपनीने मोजोनाईट हा खडा केल्यावर त्यावर गुंतवणुक केल्यास आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इंचार्ज व्हॅलेंटीना यांच्या सांगण्यावरुन मोजोनाईक खड्यासाठी गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना कंपनीकडून आठवड्याला सहा टक्के व्याजदर दिला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने व्याजदाराची रक्कम देणे बंद केली होती. त्यामुळे ते दादर येथील कंपनीच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांना कंपनीला टाळे असल्याचे दिसून आले. यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात इतर गुंतवणुकदार आले होते. या गुंतवणुकदारांनाही गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना परतावा दिल्यानंतर कंपनीने त्यांना परतावा देणे बंद केले होते.

अशा प्रकारे कंपनीने जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत अनेकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची १३ कोटी ४८ लाख १५ हजाराची फसवणुक केली होती. सायंकाळी या गुंतवणुकदारांनी दादरच्या कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला होता. त्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रदीपकुमा वैश्य यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कंपनीचे संचालक, सीईओ, महाव्यवस्थापक आणि स्टोर इंचार्ज अशा पाचजणांविरुद्ध गुंतवणुकदारांकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीचे अनेक शाखा मुंबईसह नवी मुंबई आणि इतर शहरात आहे. तिथे अनेकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केल्याचे बोलले जाते. कंपनीत आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांची फसवणुक केली असून हा आकडा तेरा कोटीपेक्षा पाच पटीने जास्त असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर या गुन्ह्यांचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page