संस्थेसाठी जागा देण्याची बतावणी करुन समाजसेविकेची फसवणुक

एक वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मे २०२४
मुंबई, – ऍसिडपिडीत लोकांसाठी काम करणार्‍या एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयासाठी आधी मोकळा प्लॉट अणि नंतर रुम देण्याची बतावणी करुन समाजसेविकेची सुमारे अठरा लाखांची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीस एक वर्षांनी मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. राजू मलन्ना पोथराज असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. राजू हा फसवणुकीनंतर पळून गेला होता, त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दौलतबी मोहम्मद हुसैन खान ही महिला समाजसेविका असून तिची ऍसिड सर्व्हावर्स साहस फाऊंडेशन नावाची एक संस्था आहे. या संस्थेचे वांद्रे येथे एक कार्यालय असून ही संस्था ऍसिड हल्ल्यातील बळीत लोकांना मदत करण्याचे काम करते. तिचे मालाड परिसरात एक रुम असून हा रुम तिने भाड्याने दिला होता. तिला मढ परिसरात एक जागा विकत घ्यायची होती. या जागेसंदर्भात तिची राजू पोथराजशी ओळख झाली होती. यावेळी राजूने तिला वेनिला तलावाजवळ ५०० चौ. फुटाची एक जागा असून त्याची किंमत २४ लाख रुपये असल्याचे सांगितले होते. मात्र या जागेवर वाद असल्याने तिने ती जागा घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने तिला मार्वे रोड, सर्व्हे क्रमांक ३२, हिस्सा क्रमांकची १००३ चौ.् फुटाची जागा दाखविली होती. या जागेची किंमत सुमारे ४० लाख रुपये इतकी होती. ही जागा तिला तिच्या एनजीओसाठी आवडल्याने तिने ती जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या एनजीओसाठी काही इच्छुक लोकांनी मिलाप फंड रेझरच्या माध्यमातून तेरा लाख सतरा हजार रुपयांची देणगी दिली होती. या जागेसाठी तिने राजूला वीस लाख सतरा हजार रुपयांचे पेमेंट केले होते. उर्वरित रक्कम जागेचे कागदपत्रे बनविल्यानंतर देण्याचे ठरले होते.

मात्र ही रक्कम देऊनही त्याने जागेचे कागदपत्रे बनवून दिले नाही. सतत विचारणा करुनही त्याच्याकडून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे जागेसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने तिला दोन लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रक्कम परत केली नाही. काही दिवसांनी त्याने पैशांच्या मोबदल्यात तिला रुम देण्याचे आश्‍वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत रुम दिला नाही. अशा प्रकारे राजूने आधी जागा आणि नंतर संस्थेसाठी रुम देण्याचे आश्‍वासन देऊन तिची अठरा लाखांची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर एप्रिल २०२३ रोजी राजूविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना एक वर्षांनी राजू पोथराज याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page