बोरिवली-वर्सोवा प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणुक
दिड कोटीच्या फसवणुकीप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बोगस दस्तावेज दाखवून बोरिवलीसह वर्सोवा परिसरातील प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका बिल्डरची सहाजणांच्या टोळीने सुमारे दिड कोटीची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. भरत विठ्ठल धावडे, मुनेश्वर यादव, संजय पारस शाह, संजय गुप्ता ऊर्फ संतोष गुप्ता, आशिष मिश्रा आणि मोहम्मद सलीम अहमद सिंग अशी या सहाजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
रामरहिश रामजियावन मिश्रा हे 48 वर्षांचे तक्रारदार बिल्डरसह विकासक म्हणून काम करत असून ते नालासोपारा येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्यांची संबंधित आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांनी त्यांना बोरिवली परिसरात एक मोठा प्लॉट असल्याची बतावणी करुन या प्लॉटवर त्यांनी बांधकाम केल्यास भविष्यात त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टाजवळील प्लॉटची पाहणी केली होती. हा प्लॉट भरत धावडे आणि राज सिंघानिया यांच्या मालकीचा असल्याचे सांगून त्यांनी प्लॉटचे काही दस्तावेज दाखविले होते. तसेच अंधेरीतील वर्सोवा परिसरात त्यांच्या मालकीचे एक प्लॉट असल्याचे सांगून या दोन्ही प्लॉटची त्यांना विक्री करायची आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी प्लॉटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी त्यांनी ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत टप्याटप्याने दिड कोटी रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांना प्लॉटचे बोगस दस्तावेज दिले होते.
या दस्तावेजाची शहानिशा केल्यांनतर रामरहिश मिश्रा यांनी ते सर्व दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले. स्वतचा प्लॉट असल्याची बतावणी करुन त्यांनी बोगस दस्तावेज दाखवून त्यांच्याशी प्लॉटचा व्यवहार करुन दिड कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित आरोपींकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस उपायुक्तासह बोरिवली पोलिसांत सहाही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भरत धावडे, मुनेश्वर यादव, संजय शाह, संजय गुप्ता आशिष मिश्रा आणि मोहम्मद सलीम या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधित सहाजणांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.