तेरा फ्लॅटसाठी १.३० कोटीचा अपहारप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
मोकळ्या प्लॉटवर रहिवाशी इमारतीचे आमिष दाखवून गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – भिवंडीतील पडघा परिसरात असलेल्या एका मोकळ्या प्लॉटवर रहिवाशी इमारतीचे बांधकाम करुन याच इमारतीमध्ये तेरा फ्लॅटसाठी बुकींग म्हणून एक कोटी तीस लाख रुपये घेऊन एका व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने फसवणुक केल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध भांडुप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चारही आरोपी पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकलाक अहमद शहा, अनिस अहमद शहा, पुरब स्वरुपचंद दर्डा आणि सौरभ स्वरुपचंद दर्डा अशी या चौघांची नावे आहेत.
आलम अन्वर खान हे भांडुपच्या सोनापूरचे रहिवाशी असून त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. एकलाक हा त्यांच्या परिचित असून तो रियल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतो. एकाच परिसरात राहत असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. त्याने त्यांना स्वस्तात फ्लॅट, व्यावसायिक गाळे देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. मात्र त्यांना मुंबईत गुंतवणुक करायची नव्हती. मुंबईबाहेर एखादी जागा असल्यास त्यात नक्की गुंतवणुक करु असे त्यांनी त्याला सांगितले. काही महिन्यांपूर्वी एकलाक व त्याचा भाऊ अनिस शहा यांनी त्यांची पुरब दर्डा आणि त्याचा भाऊ सौरभशी ओळख करुन दिली होती. या भेटीत त्यांनी दर्डा यांच्या मालकीची भिवंडीतील पडघा परिसरात मोठी जमिन असून तिथे त्यांना एक रहिवाशी इमारतीचे बांधकाम सुरु करायचे आहे. आगामी काळात या इमारतीच्या फ्लॅटला चांगला भाव मिळेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या निर्माणधीण इमारतीमध्ये गुंतवणुकीची ऑफर दिली होती. या संभाव्य इमारतीचे त्यांनी एक व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकला होता. हा व्हिडीओ तसेच मोकळ्या प्लॉटचे दस्तावेज पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे चार हजार चौ. फुट दराने फ्लॅटची विक्री होईल, मात्र त्यांनी आधीच फ्लॅट बुक केल्यास त्यांना दोन हजार चौ. फुटाने फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. ही ऑफर चांगली होती, त्यामुळे आलम खान यांनी कुटुंबियांशी चर्चा करुन दर्डा यांच्या निर्माणधीन इमारतीमध्ये ५०० चौ. फुटाच्या तेरा फ्लॅटची बुकींग केली होती. यावेळी त्यांच्या तेरा फ्लॅटची खरेदी-विक्रीचा एक कोटी तीस लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता. त्यामुळे आलम खान यांनी एकलाक आणि अनिसवर विश्वास ठेवून पुरब आणि सौरभ दर्डा यांना एप्रिल २०२३ ते २० मार्च २०२४ या कालावधीत १ कोटी ३० लाख रुपये कॅश आणि धनादेशद्वारे दिले होते.
मात्र पेमेंट करुनही त्यांच्याकडून इमारतीच्या प्रोजेक्टचे काम सुरु करण्यात आले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर दर्डा बंधू यांच्याकडून विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न सुरु होता. एप्रिल २०२४ पर्यंत त्यांनी इमारतीचे बांधकाम केले नव्हते. विविध परवानगी मिळविण्यात उशीर होत असल्याचे ते टाळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे तेरा फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे दिले नाही. त्यांनी मोकळ्या प्लॉटचे दाखविलेले कागदपत्रेही बोगस होते. तो प्लॉट दर्डा बंधूंचा नव्हता. आनंद बावरे व इतरांच्या मालकीचा होता. फसवणुकीच्या उद्देशाने या चौघांनी त्यांच्याकडून फ्लॅटसाठी आगाऊ पेमेंट घेऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एकलाक शहा, अनिस शहा, पुरब दर्डा आणि सौरभ दर्डा य चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.