पोक्सोच्या 40 वर्षांच्या आरोपीच्या उपचारादरम्यान मृत्यू
बळीत मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत जखमी झाला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेल्या विशाल नावाच्या एका 40 वर्षांच्या आरोपीचा बुधवारी रात्री उशिरा जे. जे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. विनयभंगाचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विशालला बळीत मुलीच्या नातेवाईकांसह स्थानिक रहिवाशांनी पकडून बेदम मारहाण करुन त्याला पायधुनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या मारहाणीत त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी आरोपीच्या मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
34 वर्षांचे तक्रारदार डोंगरी परिसरात राहत असून त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत या मुलीशी विशाल या आरोपीने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तो सतत बळीत मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग करत होता. हा प्रकार मुलीकडून तिच्या वडिलांना समजताच त्यांच्यासह इतर नातेवाईकांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी विशालला पकडून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याला पायधुनी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. याप्रकरणी तक्रारदाराच्या जबानीवरुन पोलिसांनी विशालविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी 15 फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.
मंगळवारी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्याला तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यात मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. हा अहवाल नंतर पायधुनी पोलिसांना देण्यात आला. याबाबतचा तपास अहवाल लवकरच पायधुनी पोलिसांकडून पोक्सो कोर्टात सादर केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.