लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांत आरोपीला शिक्षा
तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2025
ठाणे, – लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या गुन्ह्यांतील एका आरोपीला विशेष पोक्सो कोर्टाने वीस वर्षांच्या सश्रम कारावासासह वीस हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन सहा महिन्यांचा कारावास सुनावण्यात आला आहे. महेश सखाराम कांबळे असे या 23 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याला तेरा वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अलीकडेच कोर्टाने दोषी ठरविले होते.
पिडीत तेरा वर्षांची मुलगी ठाण्यातील कळवा परिसरात राहते. 17 ऑगस्ट 2021 रोजी तिच्यावर महेश कांबळे याने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध कळवा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर व त्यांच्या पथकाने काही तासांत महेश कांबळे याला अटक केली होती. गुन्ह्यांचा तपास पूर्ण होताच त्याच्याविरुद्ध विशेष पोक्सो कोर्टाचे न्या. डी. एस देशमुख यांच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती. अलीकडेच खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्या. डी. एस देशमुख यांनी आरोपी महेश कांबळे याला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने भादवी आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत वीस वर्षांच्या सश्रम कारावासासह वीस हजार रुपयांच्या दंडाची, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सहा महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्यांत सरकारी वकिल म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एस ठाकूर, पोलीस हवालदार पाटणकर, वर्हाडे, शिंदे यांनी तपास पूर्ण करुन कोर्टात ठोस पुरावे सादर केले होते. त्यामुळे आरोपीला दोषी ठरविण्यात यश आले.