लैगिंक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा कारावास
साडेचार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंब्रा, – दोन वर्षांपूर्वी एका साडेचार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर विनयभंगासह लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी पांडुरंग सुदाम शेलार या ४७ वर्षांच्या आरोपीस विशेष जिल्हा पोक्सो न्यायालयाने वीस वर्षांच्या कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
साडेचार वर्षांची पिडीत मुलगी तिच्या पालकांसोबत राहत असून आरोपी हा त्यांच्या कुटुंबियांच्या परिचित आहे. दोन वर्षांपूर्वी ती त्याच्या घरी गेली होती. घरात खेळत असताना तिथे कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देऊन त्याने तिला सोडून दिले होते. हा प्रकार मुलीकडून तिच्या पालकांना समजताच त्यांनी पांडुरंग शेलारविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्यविरुद्ध पोलिसांनी ३७६ (आय), ३५४, ५०६ भादवी सहकलम ४, ६, ८, १२ पोक्सो सहकलम ३ (१), (डब्ल्यू) शेड्युल कास्ट कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी जिल्हा विशेष पोक्सो न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्या. दिनेश देशमुख यांनी आरोपी पांडुरंग शेलार याला भादवीसह पोक्सो आणि शेड्यूल कास्ट कायद्याच्या सर्व कलमांतर्गत दोषी ठरवून वीस वर्षांचा सश्रम कारावासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात सरकारी वकिल म्हणून संध्या म्हात्रे यांनी काम पाहिले तर आरोपी शिक्षा होण्यासाठी तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर, रायटर पोलीस हवालदार देवेंद्र पवार, कोर्ट कारकून पोलीस हवालदार विद्यासागर कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.