मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – सरकारी कामात अडथळा आणून कर्तव्य बजाविणार्या एका पोलीस शिपायाशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन मारहाण झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ओम आमोल भालशंकर या 22 वर्षांच्या आरोपी तरुणाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. ओम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध तीनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.
ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजता विक्रोळीतील वर्षानगर, अमरदिप सोसायटी, वाटुरे चाळीत घडली. प्रविण साहेबराव मोहोड हे नवी मुंबईतील वाशी परिसरात राहत असून पार्कसाईट पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडेआठ वाजता ते अमरदिपक सोसायटी वाटुरे चाळीजवळ कर्तव्य बजावित होते. यावेळी तिथे आलेल्या ओम भालशंकर याने त्यांना पोलिसांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यांना मारहाण केली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यात त्यांच्या हाताला आणि डोळ्याला मुक्का मार लागला होता. त्यांचा युनिफॉर्म फाटला तसेच बटन तुटले होते. यावेळी प्रविण मोहोड यांच्यासोबत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे काळे यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती.
ही माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पळून गेलेल्या ओम भालशंकर याला पोलिसांनी विक्रोळी येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करुन मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. ओम हा विक्रोळीतील वर्षानगर, सुदर्शन चाळीत राहत असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पार्कसाईट पोलीस ठाण्यात विनयभंगासह शिवीगाळ करुन धमकी देणे, मारहाण करणे, रॉबरीच्या तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.