सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकणी तीन गुन्हे दाखल

महिला शिपायावर चाकूने हल्ला तर हवालदाराला रिक्षाने फरफटत नेल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जानेवारी २०२५
मुंबई, – शासकीय कर्तव्य बजाविणार्‍या तीन पोलिसांशी हुज्जत घालून, धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील एका घटनेत आरोपीने एका महिला शिपायावर चाकूने हल्ला तर दुसर्‍या घटनेत रिक्षाचालकाने पोलीस हवालदाराला रिक्षासोबत काही अंतर फरफटत नेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी मालवणी, मानखुर्द आणि पवई पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना मालवणी पोलिसांनी अटक केली तर पवई पोलिसांनी आरोपीला अटक करुन नोटीस देऊन सोडून दिले. तिसर्‍या गुन्ह्यांतील रिक्षाचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अमृता रमेशपुरी गोसावी या दादर येथील नायगाव परिसरात राहत असून मालवणी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री त्या पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार फारुखी, पोलीस शिपाई खुडे आणि बीट मार्शल शिपाई पवार, मसुब दुरुगळे, डिपोळे यांच्यासोबत मालाडच्या मालवणी परिसरात नाकाबंदी कर्तव्यावर हजर होत्या. यावेळी चारकोप नाका कब्रस्तानासमोर दोनजण समीर अनिल दारोळे यांना शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्यापैकी एकाने त्याच्याकडील चाकूने समीरवर वार केले होते. त्यात त्याच्या छातीला दुखापत झाली होती. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्यातील भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी अमृता गोसावी यांच्याशी अरेरावी करुन त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली होती. त्यानंतर अमृतासह पोलीस हवालदार फारुखी यांनी त्याला थांबविण्यचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्याकडील चाकूने अमृता यांच्यावर वार केले आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात अमृता यांना दुखापत झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पंकज बचनू गुप्ता आणि दिपक नरसिंग राठोड या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

लक्ष्मण मधुकर मोझर हे पोलीस हवालदार असून सध्या पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मंगळवारी सकाळी पावणेबारा वाजता ते मानखुर्द टी जंक्शन येथील ब्रिजजवळ मानखुर्द रेल्वे स्थानकाकडून आयओसी जंक्शनकडे जाणार्‍या रस्त्यावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांनी एका रिक्षाचालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षाचालकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने त्यांना रिक्षासोबत काही अंतर फरफरत नेले. त्यात त्यांच्या डाव्या गुडघ्याला, उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यांना कुठलीही वैद्यकीय मदत न करता रिक्षाचालक पळून गेला होता. याप्रकरणी लक्ष्मण मोझर यांच्या तक्रारीवरुन मानखुर्द पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

तिसरी घटना पवई परिसरात घडली. दत्तात्रय लहुदेव बेलदार हे साकिनाका वाहतूक विभागात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी अकरा वाजात ते पवईतील जेव्हीएलआर, आयआयटी मार्केट गेट, जोगेश्‍वरीकडे जाणार्‍या वाहिनीवर कर्तव्य बजावत होते. यावेळी अक्षय बाळासाहेब बर्गे या २८ वर्षांच्या तरुणाने त्यांच्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांच्या अंगावर धावून त्यांना हाताने मारहाण केली होती. याप्रकरणी दत्तात्रय बेलदार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अक्षय बर्गेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्हयांत अटक करुन त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page