मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कारागृह पोलीस भरतीदरम्यान मैदानी परिक्षेत चिपची अदलाबदल करणे दोन उमेदवारांना चांगलेच महागात पडले आहे. चिपची अदलाबदल करुन मैदानी परिक्षा देणार्या या दोघांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राम सुरेश गुंटेवाड आणि श्रीधर मधुकर पल्लेवाड अशी या दोघांची नावे ते दोघेही मूळचे नांदेडच्या मंगरुळ, हिमायतनगर तर तेलंगवाडीच्या उस्माननगरचे रहिवाशी आहेत. पोलीस शिपाई होण्यापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे या दोघांचा पोलीस शिपाई होण्याचे स्वप्न भंगले आहे. यापुढे त्यांना कुठलीही शासकीय नोकरी मिळणार नाही.
आशिष मितेश कार्ले हे सांताक्रुज पोलीस वसाहतीत राहत असून सांताक्रुज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या ते प्रतिनियुक्तीवर घाटकोपरच्या कारागृह पोलीस भरती बंदोबस्त लोहमार्ग मुख्यालयात कामाला आहेत. सध्या तिथे कारागृह पोलीस भरतीची मैदानी चाचणी परिक्षा सुरु असून ते सहाय्यक प्रमुख म्हणून काम पाहतात. गुरुवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजता मैदानी परिक्षेसाठी काही उमेदवारांना बोलाविणत आले होते. त्यात राम गुंटेवाड आणि श्रीधर पल्लेवाड या दोन उमेदवारांचा समावेश होता. या दोघांनी १६०० मीटर रनिंग चाचणी पूर्ण केल्यानंतर टेक्निशियन आशुतोष मौर्य यांनी त्यांच्या नेट टाईमची पाहणी केली होती. यावेळी या दोघांच्या धावण्याच्या सरासरी वेळेत प्रचंड तफावत आढून आली होती. सॉफ्टवेअरने तसे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे त्यांच्या धावण्याचा रेकार्ड तपासले असता त्यातही त्यांना तफावत दिसून आले होते. हा प्रकार त्यांनी राखीव पोलीस निरीक्षक शिंदे आणि पोलीस उपायुक्त वैशाली शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे त्यांनी या दोघांनाही टेक्निशियन रुममध्ये आणून त्यांच्या रनिंग इव्हेटचे सर्व लॅप रिपोर्ट काढून तपासणी केली होती. त्यात राम आणि श्रीधर यांचा नेट टाईम ४.४४.९०० असा आढळून आला.
प्रत्यक्षात ते दोघेही केवळ दोन लॅप धावले होते. त्यामुळे त्यांच्या रेकॉर्ड टाईम आणि लॅपमध्ये मोठी तफावत होती. त्यामुळे त्यांच्या पायातील चिपची पाहणी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपसांत संगनमत करुन पायातील चिप बदली करुन त्याचा फायदा निवड प्रक्रियेसाठी व्हावा या उद्देशाने केल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे या दोघांनी चिपची अदलाबदल करुन शासनाची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर आशिष कार्ले यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर राम गुंटेवाड आणि श्रीधर पल्लेवाड या दोन्ही उमेदवाराविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने या दोघांवर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने मैदानी चाचणीसाठी आलेल्या इतर उमेदवारामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.