पोलीस वसाहतीतील राहत्या घरी पोलीस हवालदाराची आत्महत्या
आजारासह कौटुंबिक कलहातून गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – अंधेरीतील पोलीस वसाहतीत राहणार्या मुकेश दत्तात्रय देव या 46 वर्षांच्या पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आजारासह कौटुंबिक कलहातून मुकेश देव यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्याकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडली असून त्यात त्यांनी त्यांच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी एडीआरची नोदं करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान मुकेश देव यांच्या आत्महत्येने पोलीस वसाहतीतील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
ही घटना शनिवारी 16 ऑगस्टला सायंकाळी साडेचार वाजता अंधेरीतील सहार रोड, न्यू पोलीस लाईनमध्ये घडली. तेथील तळमजल्यावरील रुम क्रमांक सोळामध्ये मुकेश देव हे राहत असून सध्या एलए चार मरोळ येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा दुसरा भाऊ केतन दत्तात्रय देव हेदेखील पोलीस खात्यात असून अंधेर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून काम करतात. मुकेश व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता. हा वाद काही दिवसांपासून विकोपास गेला होता. त्यातून तीन महिन्यांपूर्वी त्यांची मुलांसह त्यांना सोडून माहेरी निघून गेली होती. या घटनेने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यात त्यांच्या आजारपणामुळे ते मानसिक नैराश्यात होते. याच नैराश्यातून शनिवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना त्यांनी सिलिंग फॅनला शॉलने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सायंकाळी त्यांचा भाऊ केतन हा तिथे गेला होता. यावेळी त्यांना मुकेश देव यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती नंतर मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून अंधेरी पोलिसांना देण्यात आली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी मुकेश यांना तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसायट नोट सापडली आहे. त्यात मुकेश देव यांनी माझ्या मुलांना माझ्यापासून दूर नेले तिथे मी संपलो, लढाई हरलो. माझ्या मृत्यूस कोणास जबाबदारधरु नये असे नमूद केले आहे. याप्रकरण केतन देव यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांनी मुकेश देव यांच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरले नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नव्हती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ हे पुढील तपास करत आहेत.