पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी वॉण्टेड पोलीस पतीला अटक
अनैतिक संबंधाच्या वादाला कंटाळून पत्नीने जीवन संपविले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 ऑगस्ट 2025
मुंबई, – अनैतिक संबंधावरुन होणार्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या पोलीस पतीला अखेर वनराई पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. अमोल भाऊलाल राऊत असे या 34 वर्षीय आरोपी पतीचे नाव असून तो सध्या राज्य राखीव पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, त्याला नाशिक येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर त्याची पत्नी सारिका अमोल राऊत हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना बुधवार 20 ऑगस्टला सकाळी गोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प, गु्रप आठमध्ये घडली होती. मूळचे नाशिकचे रहिवाशी असलेले अमोल आणि सारिका यांचा आठ वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबियांचा संमतीने विवाह झाला होता. विवाहानंतर सारिका ही गोरेगाव येथील अमोलच्या एसआरपीएफ कॅम्प, ग्रुप आठमधील सासरी आली होती. 2024 पर्यंत त्यांचा संसार सुरळीत होता. मात्र नंतर अमोलच्या आयुष्यात एक तरुणी आली होती. त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे अमोल सांगत असला तरी त्यांच्यात अनैतिक संबंध होते.
याच संबंधातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. दारुच्या नशेत अमोल सारिकाचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. या अनैतिक संबंधासह पतीकडून होणार्या छळामुळे सारिका ही मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने 20 ऑगस्टला तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले होते. हा प्रकार नंतर तिच्या कुटुंबियांना समजताच ते सर्वजण मुंबईत आले होते. याप्रकरणी तिचा भाऊ समीर सोनावणे याने वनराई पोलिसांत अमोल राऊतविरुद्ध त्याच्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमोल राऊतविरुद्ध पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली. मुंबईत आणल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.