शिपाई महिलेशी हुज्जत घालून धक्काबुक्की महागात पडली
विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० जून २०२४
मुंबई, – वाहतूकीचे नियमन करणार्या एका पोलीस शिपाई महिलेसह तिच्या सहकार्यांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करणे एका २८ वर्षांच्या चालक आरोपीस चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी विनयभंगासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संदीप त्रिभुवनदास कनोजिया याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही नवी मुंबईतील उल्वे परिसरात राहते. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ती पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. शनिवारी ती तिच्या सहकार्यांसोबत चेंबूरच्या पांचरापोळ, वाहतूक शाखेजवळ वाहतूक नियमन करत होती. यावेळी एका टुरिस्ट कारला पोलिसांनी थांबवून चालकाला ड्रेसबाबत विचारणा केली होती. मात्र त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्याला विरोध करुन या चालकाने तक्रारदार महिला पोलीस शिपायासह इतर पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली. तिची कॉलर पकडून जोरात धक्का दिला होता. त्यामुळे इतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर त्याने तिथे प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती प्राप्त होताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गोंधळ घालणार्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्याचे नाव संदीप कनोजिया असल्याचे उघडकीस आले. चालक म्हणून काम करणारा संदीप हा पनवेल येथील करंजाडे, साईधाम काळ वैभव मंदिर परिसरात राहतो. याप्रकरणी या शिपाई महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संदीपविरुद्ध १८६, ३५३, ३५४, ५०४, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.