घाटकोपर पोलीस वसाहतीत पोलीस हवालदाराची आत्महत्या
राहत्या घरी नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – घाटकोपर पोलीस वसाहतीत किशोर म्हस्के या पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. राहत्या घरी त्यांनी नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांच्याकडे सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली होती. दरम्यान पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
किशोर म्हस्के हे पोलीस दलात सध्या पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची नेमणूक आझाद मैदान पोलीस ठाण्यात होती. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथील पोलीस वसाहतीत राहत होती. मंगळवारी सकाळी त्यांनी घरात कोणीही नसताना नॉयलॉनच्या दोरीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांना समजताच त्यांनी त्यांना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. किशोर यांच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. मात्र त्यांना कुठले नैराश्य होते याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
किशोर म्हस्के हे मनमिळवू आणि नेहमीच सर्वांना मदत करणारे पोलीस हवालदार म्हणून परिचित होते, त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात प्रचंड शोककळा पसरली होती.