मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जून २०२४
मुंबई, – गाळा खरेदी-विक्री व्यवहारात एका निवृत्त पोलीस निरीक्षकाची फसवणुक करुन टोकन म्हणून दिलेल्या पंधरा लाखांचा अपहार केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रमेश नारायण शेट्टी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत रमेशची पत्नी अनिता रमेश शेट्टी आणि मित्र लक्ष्मण पवार हे दोघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात गाळ्यासह घराबाबत केस प्रलंबित असताना रमेशने गाळ्याचा व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मनोज काशिराम सातारकर हे जोगेश्वरीतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, राजेश्वर सहकारी सोसायटीमध्ये राहतात. ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई पोलीस दलातून ते पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतचा व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने पीएफ आणि इतर अलाऊन्समधून गाळा खरेदीत गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांना रमेश जनरल स्टोर नावाचे एक दुकान विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका मित्राकडे विचारपूस केली होती. यावेळी या मित्राने तिथे एक चहाची टपरी आणि एक खोली असल्याचे सांगितले. त्यामुळे ते त्यांचा मित्र दिपक घाग, रमेश शेट्टी यांच्यासोबत वकिल म्हात्रे यांच्या कार्यालयात गेले होते. तिथे रमेशने त्यांच्या बहिणीसोबत त्यांचा वाद असून हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले. ती जागा त्यांच्या आईच्या नावावर असून तिचे कोरोनामध्ये निधन झाले होते. ती जागा तिने गिफ्ट डिड म्हणून त्यांच्या नावावर केली आहे. त्यात त्यांची बहिण शंकुतला नारायण शेट्टी आणि मेहुणा रिशी कृष्णन यांची स्वाक्षरी असल्याचे सांगितले. याबाबत सर्व कागदपत्रे त्यांनी दाखविले होते. सर्व कायदेशीर व्यवहार झाल्यानंतर त्यांना दुकानासह खोलीचे मूळ कागदपत्रे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्यात दुकानासह खोलीच्या खरेदी-विक्रीचा ९० लाखांमध्ये सौदा झाला होता. काही दिवसांनी रमेशने त्यांना कॉल करुन त्याला पैशांची तातडीने गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला व्यवहाराचे टोकन म्हणून पंधरा लाख रुपये दिले होते. ही रक्कम घेतल्याचे त्याने एका स्टॅम्प पेपर लिहून घेतले होते. व्यवहार पूर्ण न झाल्यास त्यांना ती रक्कम परत केली जाईल असे नमूद करण्यात आले होते.
मार्च २०२३ रोजी मनोज सातारकर त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा व्यवहार सुरु असलेल्या जागेची पाहणीसाठी गेले होते. यावेळी तिथे तीन महिला होत्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नावे सुवर्णा सुंदरी रिषी कृष्णन, कल्पना नारायण शेट्टी आणि तुलसी नारायण शेट्टी असल्याचे सांगितले. त्या तिघीही रमेश शेट्टी यांच्या बहिणी होत्या. त्यांनी रमेशसोबत त्यांना दुकानासह घराचा व्यवहार सुरु असल्याचे सांगितले. यावेळी या तिघींनीही त्याच्यासोबत व्यवहार करु नका. कारण त्यांनी रमेशविरुद्ध दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. त्याने दुकानासह घराचे बोगस दस्तावेज बनवून त्याची विक्री सुरु केली आहे. या व्यवहारात त्यांना तो हिस्सा देत नसल्याने त्यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे तुम्ही केलेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांना हा व्यवहार न करण्याचा सल्ला दिला. या प्रकाराने मनोज सातारकर यांना धक्काच बसला होता. बहिणीसोबत असलेला वाद संपला असून व्यवहार पूर्ण करु असे सांगून रमेश, त्याची पत्नी अनिता आणि मध्यस्थी लक्ष्मण पवार या तिघांनी त्यांना खोटी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी टोकन म्हणून दिलेल्या पंधरा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी ती रक्कम दिली नाही. पंधरा लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नोव्हेंबर २०२३ रोजी रमेश, अनिता आणि लक्ष्मण या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत सात महिन्यानंतर रमेश शेट्टी याला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.